मुक्त विद्यापीठ – युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे राज्यात आठ रोजगार मेळाव्यांचे नियोजन
पहिला मेळावा १२ डिसेंबरला नाशिकला; २० कंपन्यांमधील २१५० जागा उपलब्ध
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाऊंडेशन (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांतर्गत १८ ते ३५ वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी आठ रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक विद्यापीठ मुख्यालयातील कृषी विज्ञान केंद्र येथे पहिल्या रोजगार मेळावयाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनाखाली होणाऱ्या या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील २० पेक्षा अधिक नामांकित व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील २१५० हून अधिक रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत.
या नोकरी मेळाव्यासाठी सर्व शाखेतील पदवीधर, आय.टी.आय. (सर्व ट्रेड्स), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), सी.एन.सी. ऑपरेटर आणि सीपेट (CIPET) शिक्षण पूर्ण केलेले तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोफत अर्ज करू शकतात. त्यासाठी https://forms.gle/iWT8edXwgXM58ZVD8 ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार १५ ते ३० हजार रुपये वेतनासह त्या त्या कंपनीच्या धोरणानुसार जेवण, निवास, बस सुविधा आणि ओव्हरटाईमही लागू असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ९८२२५ ४४०९४, ९९२२३ ७९३१९, ८६९८५ ०४७५२, ९०२१४ २२४७९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विभागीय संचालक डॉ. एस. आर. निकम, ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा संचालक प्रा. कैलास मोरे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पवार व श्री. विक्रमादित्य पवार यांनी केले आहे.
