मुक्त विद्यापीठात तीन दिवसीय
बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘समावेशक व समताधिष्ठित शिक्षण : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० च्या परीप्रेक्षात वैविध्यपूर्णतेसाठी शिक्षकांची सज्जता’ या विषयावरील तीन दिवसीय ‘बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद’ तसेच ‘सीटीईएफ’ (कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाउंडेशन) ची ३९ वी वार्षिक परिषद संपन्न झाली. विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाउंडेशन (CTEF – सीटीईएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही परिषद दिनांक ८ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून छत्तीसगढच्या बिलासपुर येथील गुरु घासिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अलोककुमार चक्रवाल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
व्यासपीठावर सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. एम. भांडारकर, सीटीईएफचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रा. नीलिमा भगवती (आसाम), विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना गुरु घासिदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अलोककुमार चक्रवाल म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० (एनईपी) ही भारतास विकसित राष्ट्र बनवण्याची मोहिम आहे. त्यासाठी विविध नवोपक्रम राबवले जात आहे. यात शिक्षकांनी हिरीरीने सहभागी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यास केवळ पाठ्यक्रम शिकवणे हे शिक्षकाचे काम नसून राष्ट्र विकासासाठी विद्यार्थ्याचे चारित्र्य व व्यक्तिमत्व घडविण्याची देखील जबाबदारी शिक्षकावर आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याशी शिक्षकाने संवाद साधायला हवा. शिक्षण क्षेत्रातील विविध खाजगी ऑनलाईन क्लासेस – प्लॅटफॉर्म यशस्वी कसे होत आहेत याचा विचार करता शिक्षकांनी भारतीय शिक्षण प्रणालीचा देखील अभ्यास करायला हवा असे आवाहन देखील त्यांनी केले. अध्यक्षपदावरून बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की विकसित भारत – २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विदयार्थ्यांनी आता एकाऐवजी बहुविध विद्याशाखांचा अभ्यास करायला हवा. अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त करतांना त्या ज्ञानाचा सदुपयोग करण्याचे शहाणपण देखील विद्यार्थ्याने अवगत केले पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यशाळांमधून शिक्षक – विद्यार्थी एकत्र येत विचार – कल्पनांची देवाणघेवाण होवून एकमेकांची भूमिका निश्चित करण्यास मदत होत असल्याचे देखील ते म्हणाले.
परिषदेत सीटीईएफ संघटनेच्या आसाम शाखेच्या संकेतस्थळाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच संघटनेच्या केरळ शाखेस उत्कृष्ट शाखा व उत्कृष्ट पत्रिका प्रकाशन म्हणून गौरवण्यात आले. सीटीईएफ संघटनेतर्फे मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचा ‘आयकॉन ऑफ टीचर एज्युकेशन’ या तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठ (एनयुईपीए) च्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांचा ‘अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स इन टीचर एज्युकेशन’ हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
परिषदेत प्रा. मनोज सक्सेना (हिमाचल प्रदेश), डॉ. गजानन गुल्हाने, प्रा. आर. सी. पटेल व प्रा. भरत जोशी (गुजरात), प्रा. रेणू नंदा (जम्मू), प्रा. डेसी बोरा (दिब्रुगढ), प्रा. विजय कांची (जळगाव), डॉ. दत्तात्रय तापकीर (पुणे), आचार्य श्रेयस कुऱ्हेकर (नागपूर), प्रा. धनंजय जोशी (दिल्ली), प्रा. ब्रिंदा बेजली (शिलॉंग), डॉ. सीमा धवन (उत्तराखंड), डॉ. व्ही. रेगु (केरळ), डॉ. तानिया गुप्ता (दिल्ली), डॉ. के. वाय. बेन्डेक्ट (केरळ), डॉ. अर्चना भट्टाचार्य आदी देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक व प्रशासक यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण – २०२० अंमलबजावणी व त्यानुसार शिक्षक आणि शिक्षणासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा आणि संधींचा सखोल विचार या परिषदेत करण्यात आला. तंत्रज्ञानाधिष्ठित अध्यापन, डिजिटल साक्षरता, मुक्त व दूरस्थ शिक्षणाची भूमिका, बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षणपद्धती, जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीयीकरण, मानवी मूल्ये, मानसिक व शारीरिक आरोग्य, जीवनकौशल्ये तसेच २०४७ च्या विकसित भारतासाठी शिक्षकांची भूमिका या विषयांवर परिषदेत विचारमंथन करण्यात आले. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून समावेशक, समताधिष्ठित आणि शाश्वत समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या परिषदेतून अधोरेखित केला गेला. परिसंवाद, चर्चासत्रे आणि अनुभवांची देवाणघेवाण यांद्वारे शिक्षक शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी नवे दृष्टिकोन मांडले गेले. इंग्रजीसोबतच मराठी व हिंदी भाषेतील ५१ शोधनिबंध सारांश परिषदेत सादर केले गेले.
परिषदेचे उद्घाटन दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठ (एनयुईपीए) च्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आपल्या उद्घाटनपर भाषणप्रसंगी बोलतांना कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत हे एक विशिष्ट तत्व, संस्कृती असणारे राष्ट्र असल्यामुळे त्याअनुषंगाने येथील शिक्षण पद्धती असायला हवी यावर भर दिला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी – पुणे) चे कुलगुरू प्रा. एन. जे. पवार यांनी आपल्या बीजभाषणात सर्वसमावेशक व सर्वांगीण शिक्षणासाठी बहुविद्याशाखीय शिक्षण उपयुक्त असल्याचे सांगतानाच वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती कायम ठेवणे आणि शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे या सारख्या समस्या अग्रक्रमाने सोडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. एम. भांडारकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) प्रमाणे भारतीय शिक्षण सेवा सुरु करावी, देशातील प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय पातळीवरील निधी उभारण्यात यावा, अशी मागणी केली. सीटीईएफचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रा. नीलिमा भगवती यांनी संघटनेची माहिती देत नेपाळ, भूतान येथे संघटनेचे काम सुरु असल्याचे सांगत आगामी काळात ते थायलंड, श्रीलंका येथे सुरु करण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले.
