मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत
जिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे
छत्रपती संभाजीनगर – एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तिप्रमाणे जिल्हावासीय जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या आपल्या शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, व्यक्तिंनी आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१२ रोजीच्या दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातून ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपये इतका निधी जमा झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सार्वजनिक, संस्था, उद्योजक, उद्योग समूह सामान्य जनता यांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत लोकांनी मदतीचा ओघ सुरु केला. उद्योग क्षेत्राने त्यात भरीव योगदान दिले. सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने १ कोटी रुपये, आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर या संस्थेने एक कोटी रुपये असे योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या मदतीतून ८६ हजार ३०० रुपये जमा करण्यात आले. मराठी अर्थशास्त्र परिषद ३ लाख ६२ हजार, जिल्हा मजूर कामगार सहकारी संघ २ लक्ष रुपये, प्रोफेशन साऊंड ॲण्ड लाईट असो. ने १ लाख १११ रुपये दिले.संत एकनाथ मंदीर संस्थानाने ५१ हजार रुपये, शेंद्रा कमंगर ग्रामसभा १ लाख ११ हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर तहसिलदार कार्यालयाने २ लाख १२ हजार ४७५ रुपये, ग्राम औद्योगिक शिक्षण मंडळ २५ लाख रुपये अशा विविध २९ संस्थांनी सर्व मिळून ३ कोटी १६ लाख ६० हजार ८४६ रुपये इतकी देणगी दिली आहे.
