Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन

कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा

नाशिक :- कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, महापौर हिमगौरी आहेर- आडके, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वेसह जगातील विविध देशातून मराठी बांधव नाशिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील मराठी माणूस  मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे तेथील सदिच्छा दूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव जगभरात पोहोचते, असू सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेशस्थ मराठी बांधवांना पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येण्याचे निमंत्रण दिले.

मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्य, नाट्य आणि लोकगीतांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे. मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झाली, तरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments