मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक मदत मिळण्याची संधी
परभणी: राज्यात क्रीडा संस्कृतीचा विस्तार व खेळाडू घडविण्यासाठी शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या 12 खेळांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडविणाऱ्या खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबधीत अकादमीमधील खेळाडु क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था – क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग, 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अश्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
क वर्ग अकादमींना वार्षिक रु. 10 लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक रु. 20 लक्ष व अ वर्ग अकादमींना वार्षिक रु.30 लक्ष आर्थिक सहाय्य पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उत्पन्न करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबीवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नुमन्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे.
