मंत्रीमंडळ निर्णयाची अंमलबजावणी न केल्यामुळे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची दिवाळी शिक्षण मंत्राच्या घरी- ॲड.अनिल मिसाळ
जालना/प्रतिनिधी/ महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने बैठकीत निर्णय घेऊन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात रू.१,०००/- वाढ व रु.२,०००/- दिवाळी भाऊबीज वाढ केल्याची घोषणा केली होती. त्या निर्णयाची आज पर्यंत अंमलबजावणी केलेली नाही.
महाराष्ट्रात वर्ग ०१ ते ०८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान पोषण आहार शिजवुन देणाऱ्या विधवा, परितक्ता,घटस्फोटीत,दलीत, ओबीसी, अल्पसंख्यांक व गरीब घरातील जवळपास १,७०,४२७ महिला व पुरुष कार्य करीत आहे.
ह्या कामगारांना दररोज सहा तास काम करावे लागते व ह्या मोबदल्यात त्यांना दरमहा फक्त रु. २,५००/- म्हणजे ८३/- रु. रोज दिल्या जातो. तेही वर्षातुन दहा महिणे मिळतात.
ह्याच कामाचे केरळ राज्यात रु.१८,०००/-, पासष्ट वर्षा वरील कामगारांना सेवा समाप्तीच्या वेळी रु.१,००,०००/- सानुग्राह अनुदान, त्याच कुटुंबातील व्यक्तींला कामावर घेण्याची सोय,कर्नाटक राज्या प्रमाणे सेवानिवृत्ती वेतन, तामीळनाडु, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व इतर राज्यात १२ महिण्याचे मानधन दिले जाते परंतु महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात अत्यल्प मानधन देऊन कामगारांची उपासमार केली जात आहे.
महाराष्ट्रातील कामगारांना वरील लाभ मिळण्याच्या दृष्टीने शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सिटु) च्या वतीने दि.०५ सप्टे २०२३, दि.२८ फेब्रु.२०२४ तसेच वेळोवेळी आंदोलन केले परंतु मागण्या मान्य न केल्यामुळे आझाद मैदान, मुंबई येथे धरणे – आंदोलन करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मानधन वाढ व दिवाळी भाऊबीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु त्याची अंमलबजावणी आज पर्यंत न केल्यामुळे दि.१५ ऑक्टों. २०२५ पासुन महाराष्ट्रातील सर्व शालेय पोषण आहार कर्मचारी कॉ. डॉ.डी.एल.कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष सिटु,
कॉ.ॲड.एम.एच.शेख राज्य महासचिव सिटू,आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ.डॉ.अशोक थोरात,राज्य सरचिटणीस, म.रा., कॉ. प्रा.ए. बी. पाटील, राज्याध्यक्ष फेडरेशन, सौ. मिरा शिंदे, मधुकर मोकळे ह्याच्या नेतृत्वात मा. ना. दादासाहेब घुसे, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मालेगाव जि.नाशिक येथील घरी मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन करुन दिवाळी साजरी करण्यात येईल.