केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी
नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांचा मोठा पुढाकार!*
देगलूर/प्रतिनिधी/ मराठवाड्याच्या आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या नांदेड सिव्हिल हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी सादर केली आहे. देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. जे. पी. नड्डा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन, त्यांनी नांदेडच्या आरोग्य विषयक गरजांविषयी सविस्तर चर्चा केली.*
नांदेड जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील लाखो नागरिक आरोग्य सेवेसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. सध्याचा ३०० बेडचा रुग्णालयाचा तांत्रिक व भौतिक विस्तार होऊन तो ५०० बेडपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोपछडे यांनी केली.
नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी होणे आवश्यक आहे. हृदय, मेंदू, मूत्र, यकृत, अस्थी अशा विविध गंभीर आजारांवर नांदेडमध्ये उपचार मिळावे यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यावश्यक आहे.
मराठवाडा व सीमाभागात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु योग्य उपचारासाठी त्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथे जावे लागते. म्हणून नांदेड येथे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी ठोस मागणी त्यांनी केली.
या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री श्री जे.पी.नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून,संबंधित विभागांना यावर तात्काळ अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. *डॉ.गोपछडे यांनी दिलेल्या प्रस्तावाचे मंत्री नड्डा यांनी कौतुकही केले* आणि भविष्यातील आरोग्य धोरणात याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले.
जनतेसाठी दिलासादायक पाऊल ठरेल.या मागण्यांमुळे नांदेड जिल्हा व सीमाभागातील हजारो गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळवण्यासाठी आता महानगरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य सुविधा बळकट झाल्यास नांदेड हे आरोग्य सेवेचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.