केज तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आडसकरांचा मदतीचा हात – किराणा किट वाटप करून दिलासा
केज/प्रतिनीधी/ केज तालुक्यातील मांजरा पट्यातील राजेगाव, दैठणा, भोपला या गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, म्हैस, बैल, गाई अशा जनावरांचेही जीव गेले आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आणि मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही.
या आपत्तीकाळात शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी रमेशराव आडसकर व ऋषीकेश भैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २४ बुधवार रोजी किराणा किट वाटपाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातून प्रभावित शेतकरी कुटुंबांना तातडीचा दिलासा देण्यात आला.
या वेळी मा. रमेशरावजी आडसकर साहेब, श्री. ऋषिकेश भैय्यासाहेब आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती केजचे सभापती श्री. अंकुशरावजी इंगळे, दिलीप (आबा) गुळभिले, तालुका अध्यक्ष अमर भैय्या पाटील, शिवदास तात्या पाटील तसेच सर्व सहकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संकटाच्या काळातही आडसकर व त्यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन मदतीसाठी पुढे येतात हे या उपक्रमातून दिसून आले. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा आगामी काळातही व्यक्त करण्यात येत आहे.