एमजीएममध्ये रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर/ महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘रंगसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी रंगभूमी दिनाचे उद्दिष्ट आणि महत्त्व सांगून मराठी रंगभूमी दिन आणि जागतिक रंगभूमी दिन या संदर्भात सविस्तर विवेचन केले.
यावेळी बोलताना प्रा.डॉ.सोनवणे म्हणाले, रंगभूमीच्या विकासासाठी रंगकर्मी म्हणून किंवा रसिक प्रेक्षक म्हणून आपलं प्रत्येकाचं काय योगदान असावं याबद्दलचं विचार करणे आवश्यक आहे. यावेळी सर्वच मान्यवरांनी नाटकासाठी किंबहुना नाट्यप्रयोगासाठी स्वतःच्या परीने आवश्यक ते कर्तव्य करण्याबद्दल आश्वासित केले.
प्रारंभी नटराजाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भागवत वाघ, डॉ.अमरदीप असोलकर, डॉ.अनिता फुलवाडे, डॉ. मंजुश्री लांडगे, गौरव ढोले,आरती नाटेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अपूर्वा जाधव आणि तुषार अंभोरे यांनी नाट्य पदांचे सादरीकरण केले. तसेच यश ससाने आणि पवन दशरथ यांनी काही नाट्य उताऱ्यांचे सादरीकरण केले. वेदांत लोखंडे, यश ससाने, रितेश पेंढारकर, आर्या इघारे, ज्ञानेश्वरी इधाटे, कृष्णा बावस्कर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


