उद्या टेडएक्स एमजीएमयु‘मध्ये देशभरातील मान्यवर मांडणार आपले विचार
छत्रपती संभाजीनगर :- महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ‘टेडएक्स एमजीएमयु २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम ‘इंबर : वन स्पार्क एंडलेस पॉसिबिलिटीज’ या संकल्पनेवर आधारित असून प्रेरणादायी विचार, नवकल्पना आणि सामाजिक परिवर्तनाचा संवाद साधणारा ठरणार आहे.
या टेडएक्स मंचावर देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आपले अनुभव, विचार आणि दृष्टीकोन मांडणार आहेत. यामध्ये एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, पद्मश्री प्रा.जी.डी.यादव, दिग्गज गोल्फपटू अमित लुथरा, सुप्रसिद्ध शेफ पूनम कौर बिंद्रा, बिझनेस लीडर कल्पेन शुक्ला, शेतकरी-उद्योजक सिद्धेश साकोरे, सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा दिंडे, ग्राफिक डिझायनर व उद्योजक अमोल सुतार, सिस्टिम्स थिंकर नैना साहनी आणि अवकाश तज्ज्ञ डॉ. शिरीष रावण यांचा समावेश आहे.
टेड ही जागतिक स्तरावरील ना-नफा संघटना असून, नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते. टेडएक्स हा त्याचाच स्थानिक उपक्रम असून, स्थानिक आवाजांना व्यासपीठ देत विचारांची देवाणघेवाण, सहकार्याची भावना आणि सर्जनशीलतेला चालना देतो. अशा मंचावरून वैयक्तिक व सामूहिक विकासासाठी महत्त्वाच्या विषयांवर सखोल मंथन घडते.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्राचार्या प्रा.डॉ.विजया मुसांडे, प्राध्यापक, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
