Monday, March 30, 2026
HomeUncategorizedएमजीएमचा संघ सलग सहाव्यांदा ‘अभिरूप युवा संसद’ स्पर्धेत विजयी

एमजीएमचा संघ सलग सहाव्यांदा ‘अभिरूप युवा संसद’ स्पर्धेत विजयी

एमजीएमचा संघ सलग सहाव्यांदा ‘अभिरूप युवा संसद’ स्पर्धेत विजयी

छत्रपती संभाजीनगर :- महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या संघाने ‘अभिरूप युवा संसद २०२५–२६’ विभागीय फेरीत प्रथम क्रमांक पटकावत सलग सहाव्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.

युवक बिरादरी (भारत) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ‘अभिरूप युवा संसद’ ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित संसदीय अनुकरण स्पर्धा मानली जाते. १६ ते ३० वयोगटातील युवकांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्व कौशल्ये, धोरणात्मक विचारसरणी आणि संसदीय कार्यपद्धतीची समज निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या विभागीय फेरीत विभागातील विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाने ६० मिनिटांचे ‘मॉक पार्लमेंट’ सत्र सादर केले. यामध्ये शून्य प्रहर, प्रश्नोत्तर तास आणि विधीमंडळीय चर्चा या टप्प्यांचा समावेश होता. संविधानाची समज, मांडणीची स्पष्टता, नेतृत्वगुण, संघभावना आणि संसदीय शिस्त या निकषांवर सादरि‍करणाचे मूल्यमापन करण्यात आले.

एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या १५ विद्यार्थी संसदपटूंच्या संघाने सखोल अभ्यास, शिस्तबद्ध संसदीय आचरण, प्रभावी भाषणे आणि उत्कृष्ट सांघिक प्रयत्नांच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयासह सीसीसीएमने सलग सहाव्यांदा ‘अभिरूप युवा संसद’ विभागीय चषक आपल्या नावावर ठेवत या स्पर्धेतील आपली वर्चस्वाची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षी प्रमाणे ‘अभिरुप युवा’ संसदेचे आयोजन युवक बिरादरीचे कार्यक्रम संचालक सचिन वाकुलकर यांच्या नेतृत्वात झाले. स्पर्धेला परीक्षक म्हणून रुपेश कलंत्री व साई महाशब्दे उपस्थित होते.

सांघिक यशासोबतच सीसीसीएमच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कामगिरीतही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खुशी तुरे हिला उत्कृष्ट संसदीय मांडणी, प्रक्रियेवरील प्रभुत्व आणि प्रभावी सहभागासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ द्वितीय पारितोषिकाने गौरवण्यात आले. तर साची जिवने आणि पल्लवी बेडरे यांनी संयुक्तपणे ‘उत्कृष्ट संसदपटू’ तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

ही विभागीय फेरी राष्ट्रीय अंतिम स्पर्धेसाठी पात्रता फेरी ठरली आहे. ‘युवा संसद’ ही राष्ट्रीय अंतिम फेरी दिनांक १२ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे होणार असून त्यामध्ये विभागीय फेरीतील अव्वल विद्यार्थी आपापल्या संस्थांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या मधून प्रथम येणार्‍या विद्यार्थांना  “युवा भूषण” -२०२६  पुरस्कार साठी गौरवण्यात येणार आहे. युवा भूषण पुरस्कार – प्रथम -५०,००० द्वितीय -२५,००० व तृतीय -१५००० व उतेजणार्थ प्रतेकी १०,००० चे पुरस्कार देण्यात येणार आहे.

‘अभिरूप युवा संसद’ स्पर्धेतील एमजीएमच्या विजेत्या संघाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्या डॉ. रेखा शेळके आणि सर्व संबंधितांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या संघाला प्रा. डॉ.आशा देशपांडे यांनी मार्गदर्शन केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments