एमजीएम विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे मंगळवारी आयोजन
कुलगुरू डॉ.आर.डी.कुलकर्णी एमजीएमच्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आर.डी.कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे.
एमजीएम विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठासमवेत यावेळी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती :
डॉ.आर.डी.कुलकर्णी सध्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असून त्यांना केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील ३२ वर्षांचा समृद्ध शैक्षणिक व संशोधनाचा अनुभव आहे. त्यांच्या नावावर ८६ संशोधन लेख प्रकाशित झाली आहेत. संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी करत ३ पेटंट्स मिळवले असून आणखी ६ पेटंट्स दाखल/प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना प्रा.जे.जी.काणे स्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आयआयटी, एनआयटी, आयसर तसेच राज्य विद्यापीठांमध्ये अभ्यागत/कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) ची महाराष्ट्रात अंमलबजावणी आणि चार वर्षांच्या बहुविषयक पदवी अभ्यासक्रमाच्या रचनेत त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
