एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीला मिळाले नॅकचे ‘ए’ मूल्यांकन
छत्रपती संभाजीनगर :- विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त संस्था म्हणून देशातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांचे मूल्यांकन करणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) महात्मा गांधी मिशनच्या इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीला महाविद्यालयाला ‘ए’ मूल्यांकन प्राप्त झाले आहे. पहिल्याच सायकलमध्ये असे मूल्यांकन मिळवणारे हे देशातील एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी हे भारतातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयास हे मूल्यांकन प्राप्त झाल्याबद्दल या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमजीएम सॉल्ट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त भाऊसाहेब राजळे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, डॉ.गुलाबराव खेडकर, डॉ.म्हाळसाकांत जहागिरदार, प्रकल्प संचालिका डॉ.प्रेरणा दळवी, प्राचार्य शरद बाबू, सर्व प्राध्यापक व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव म्हणाले, नॅकने आपल्या फिजिओथेरपी महाविद्यालयाला ए ग्रेड देऊन जे मूल्यांकन दिले आहे, याचा मला मनापासून आनंद झालं आहे. या नॅक प्रक्रियेत सर्वांनी चांगले काम केले असून हे सर्व श्रेय तुमचे आहे. सर्व स्टाफचे मी अभिनंदन करतो. येत्या काळामध्ये आपल्याला ए++ ग्रेड मिळवायचा आहे.
हे आपण जे यश प्राप्त केले आहे, यामध्ये आपल्या नॅकचे टीमचे नेतृत्व ज्यांनी केले ते संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांच्या अथक परिश्रमाला जाते. आपण सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांनी खूप मोठे योगदान या प्रक्रियेत दिलेले आहे. आपण सर्व जण काम करीत राहा, पुढच्या वेळी यापेक्षाही अधिक चांगला ग्रेड आपल्याला मिळेल, असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त सचिव अंकुशराव कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
एमजीएमच्या प्रकल्प संचालिका डॉ. प्रेरणा दळवी म्हणाल्या, आमच्या नॅकच्या प्रवासात महाविद्यालयाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला या ‘ए’ ग्रेडसाठी २४ x ७ काम केले आहे. एक परिवार म्हणून सर्वांनी आपले सर्वोत्तम दिले. महाविद्यालयात देशाच्या बहुतांश राज्यातील स्टाफ असल्यामुळे आमचा एसएसआर उत्तम होण्यास मदत झाली. हे आमचे यश सांघिक प्रयत्नांचे आहे.
आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि हे यश आम्हाला मिळाले. आम्ही आमचे सर्वोत्कृष्ठ दिले आणि आमच्या प्रयत्नांना यश आले, असे प्राचार्य शरद बाबू यांनी यावेळी सांगितले.
या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डॉश प्रकाश आणि डॉ.गौतमी खडके यांनी केले.
