एमजीएममध्ये भौतिकशास्त्र विषयावर राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन
अधिवेशनात क्वांटम टेक्नॉलॉजी व एआयवर होणार मंथन
छत्रपती संभाजीनगर :- महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाईड सायन्सेस आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) आरसी-०८ व सब आरसी-०८ एफ (मराठवाडा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १३ आणि शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘आयएपीटी महाराष्ट्र स्टेट कन्व्हेन्शन २०२६’ या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता एमजीएम विद्यापीठातील रूक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘रिव्होल्यूशनायझिंग फिजिक्स एज्युकेशन : इंटिग्रेटिंग क्वांटम टेक्नॉलॉजीज अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही या अधिवेशनाची मुख्य संकल्पना असून आधुनिक भौतिकशास्त्र शिक्षणातील बदलते प्रवाह, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील संशोधन दिशा यावर सखोल संवाद साधण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांच्यासह बार्क-यूजीसी–डीएई केंद्राचे संचालक डॉ. पी. डी. बाबू, आयएपीटी महाराष्ट्र प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष प्रा. महेश शेट्टी, डॉ. विनायक पट्टर, शास्त्रज्ञ डॉ.अनिंदिता बॅनर्जी, आयएपीटी शिमलाचे अध्यक्ष प्रो. डॉ. के. ए. अहलुवालिया, ईसी मेंबर प्रो. डॉ. शिवानंद मस्ती, डॉ.विनायक पाटील, डॉ. एम. एस. जोगड, डॉ. पवन कुमार ए. जी., डॉ. पृथुल आर. देसाई, प्रो. सुशील मुजुमदार, डॉ. सत्यजित पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात आधुनिक काळातील भौतिकशास्त्र शिक्षण, भौतिकशास्त्रातील नवोन्मेषी अध्यापन व अध्ययन पद्धती, क्वांटम टेक्नॉलॉजी व कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व डीप लर्निंग तंत्रज्ञान, भौतिकशास्त्रातील संशोधन व नवकल्पना, मटेरियल सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी, अभ्यासक्रम सुधारणा (एनईपी–२०२०), डिजिटल व ऑनलाइन शिक्षण तसेच परिषदेच्या थीमशी निगडित अन्य विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व चर्चासत्रे होणार आहेत.
या अधिवेशनात संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी नोंदणी आवश्यक असून भौतिकशास्त्र विषयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी या अधिवेशनास प्रवेश खुला आहे. मराठवाड्यासह राज्यातील अधिकाधिक विज्ञानप्रेमी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अधिवेशनाचे निमंत्रक एमेरिटस प्राध्यापक डॉ. के. एम. जाधव यांनी केले आहे.
