एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आधुनिक तंत्रज्ञान
छत्रपती संभाजीनगर/ एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने एमबीबीएस आणि पीजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन्स इनोव्हेशन सेल ड्रिव्हन ऍक्टिव्हिटी अंतर्गत एमजीएम विद्यापीठाच्या इनोव्हेशन इनक्युबेशन अँड रिसर्च सेंटरचे विभागप्रमुख प्रा.पंकज ढोबळे यांच्या व्याख्यानाचे द्योतन सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, प्रा.ढोबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रा.ढोबळे म्हणाले, थ्रीडी तंत्रज्ञान आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टर्स आता प्री सर्जिकल प्लॅनिंग करू शकतात. शरीरातील कोणताही अवयव थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने आता बनवणे सहज शक्य झाले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपणा विद्यार्थ्यांचा उत्साह, जिज्ञासा व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यामुळे आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे उज्ज्वल भविष्य स्पष्ट दिसून येते, असे मला मनोमन वाटते.
प्रा.ढोबळे यांनी प्रामुख्याने ऍडव्हान्स आयओटी मेडिकल डिव्हायसेस, प्री-सर्जिकल प्लॅनिंग तसेच दंतचिकित्सा, अस्थिरोग व कृत्रिम अवयव या क्षेत्रातील डिजिटल अॅनाटॉमी या विषयांवर विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. या उपक्रमातून वैद्यक व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून नाविन्यपूर्ण संशोधन संस्कृती रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
