एमजीएममध्ये शांती आणि अहिंसेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या गांधी अध्यासन विभागाच्या वतीने ४५ दिवसीय निवासी शांती आणि अहिंसेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्साहपूर्ण वातावरणात विद्यापीठात सुरू झाला आहे. वर्षामंगल दिनी कुलपती श्री. अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आणि सर्व संबंधित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अहिंसा आणि शांती या विषयावरील ४५ दिवसाच्या निवासी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली.
एमजीएम विद्यापीठ नेहमीच गांधीवादी अहिंसेच्या प्रकाशात शाश्वत जीवनाचे तत्त्व सध्याच्या पिढीला, वैयक्तिक जीवन आणि त्याचबरोबर जागतिक जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करीत असते. यामध्ये अभ्यासक्रमात ब्राझील, गांबिया, साऊथ आफ्रिका, मेक्सिको आणि भारत या देशातील एकूण १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहेत.
या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून खालील व्यक्ति सहभागी झालेले आहेत.
१. प्रा.डॉ.एम.पी.मथाई (माजी संचालक, गांधीयन थॉट अँड डेव्हलपमेंट स्टडीज स्कूल, महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टयम, केरळ )
२. फर्नांडो एच.फेरारा रिवेरो, मॉन्टेरे, मेक्सिको
३. लियांड्रो उचोआसमी, रिओ दि जानेरो, ब्राझील
४. प्रो.जॉन चेल्लादुराई, अधिष्ठाता, एमजीएम विद्यापीठ
निवासी प्रमाणपत्र अभ्यासक्रम गांधीवादी अहिंसेचे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी अनुभवाधिष्ठित आणि सहभागात्मक शिक्षणावर आधारित आहे. प्रशिक्षण, संवाद व क्षेत्रीय अभ्यासाच्या माध्यमातून शांतता, न्याय आणि शाश्वत जीवनमूल्यांचा अभ्यास केला जातो. अभ्यासक्रमात अध्यापन सत्रे, कार्यशाळा, ग्रंथालय सत्रे, अवलोकन भ्रमण, जर्नल लेखन व प्रकल्प कार्य यांचा समावेश आहे. योग-व्यायाम, दृकश्राव्य साधने, रीडिंग नोट्स यासह डिझाइन थिंकींग, गट चर्चा, केस स्टडीज यांसारख्या तंत्रांचा उपयोग केला जातो. दर आठवड्याला २४ तास अध्यापन, १५ तास व्यावहारिक शिक्षण, ट्यूटोरियल सत्रे, कॅम्पस कार्यक्रम आणि गांधी आश्रम भेट यांचा समावेश अभ्यासक्रमात आहे.
