Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादएमजीएममध्ये वर्षामंगल दिन उत्साहात साजरा

एमजीएममध्ये वर्षामंगल दिन उत्साहात साजरा

एमजीएममध्ये वर्षामंगल दिन उत्साहात साजरा

वृक्षारोपणचरखा वितरण आणि विविध उपक्रमांतून कुलपती अंकुशराव कदम यांचा ८१ वा वाढदिवस साजरा

छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : महात्मा गांधी मिशनचे सचिव तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांचा ८१ वा वाढदिवस आज ‘वर्षामंगल’ दिनाच्या रूपाने एमजीएम गांधेली कॅम्पस येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या औचित्याने वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, भूमिपूजन सोहळा, उद्घाटन आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी एमजीएम सॉल्ट हॉटेलसमोरील जागेत प्रस्तावित ‘एमजीएम कॅन्सर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिपूजनाने झाली. यानंतर पुढील कार्यक्रम गांधेली येथे संपन्न झाले. वर्षामंगल गीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या पुढील भागात वृक्षपूजन आणि वृक्षदिंडी काढण्यात आली, ज्यात एमजीएम परिवारातील सर्व सदस्य, वारकरी बंधू, अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य,विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यानंतर एमजीएम फीड प्रोडक्शन युनिटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा असा सोलर चरखा वितरण सोहळा पार पडला. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.

कुलपती अंकुशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण उपक्रम आयोजित केला जातो. यंदा एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथील १२ एकर टेकडीवर ६,००० आंब्याची झाडे आणि नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथील एमजीएम परिसरात ८१ झाडे लावण्यात येणार आहेत. अशा एकूण ६,०८१ वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार असून यातील १०० झाडे आजच्या दिवशी लावण्यात आली असून उर्वरित झाडे टप्प्याटप्प्याने लावण्यात येतील.

एमजीएम संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्यातर्फे वर्षामंगल गीतांचा विशेष कार्यक्रम पार पडला. प्रा. राजू सोनवणे आणि प्रा. राहुल खरे यांच्या टीमने वर्षामंगल गीते सादर केली.

या कार्यक्रमासाठी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे,अॅड.एस.के.कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, श्रीमती अनुराधाताई कदम, श्रीमती जयश्रीताई जाधव, श्रीमती शशिकला बोराडे तसेच एमजीएम परिवारातील सर्व सदस्य, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती अंकुशराव कदम यांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज प्रत्यक्षपणे भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments