एमजीएममध्ये मराठवाड्यातील पहिल्या सेंटर फॉर ३ डी काँक्रीट इनोव्हेशनचे उद्घाटन संपन्न
स्थापत्य व सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनचे सचिव तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिनानिमित्त एमजीएम विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठवाड्यातील पहिल्या सेंटर फॉर ३ डी काँक्रीट इनोव्हेशन या अत्याधुनिक केंद्राचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. हे केंद्र विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड रिसर्च सेंटर अंतर्गत उभारण्यात आले आहे.
या उद्घाटनप्रसंगी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
३ डी काँक्रीट प्रिंटिंग हे आधुनिक बांधकाम क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल असून या तंत्रज्ञानामुळे जलद, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बांधकाम शक्य होते. हे केंद्र डिजिटल कन्स्ट्रक्शन कौशल्य विकास, रोबोटिक आणि ऑटोमेटेड बांधकामाचे प्रशिक्षण, इंडस्ट्रीसोबत संयुक्त संशोधन, तसेच कन्स्ट्रक्शन टेक स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन इ. साठी कार्यरत असणार आहे.
या उपक्रमामुळे स्थापत्य व सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पारंपरिक भूमिकांपलीकडे ३ डी डिझाईन इंजिनिअर, डिजिटल फॅब्रिकेशन स्पेशालिस्ट, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन अॅनालिस्ट, बीआयएम एक्सपर्ट आणि स्टार्टअप फाउंडर्स यांसारख्या क्षेत्रांत करिअर संधी उपलब्ध होणार आहेत.
एमजीएम विद्यापीठाने साकारलेले हे केंद्र नव्या पिढीच्या अभियंत्यांना नवकल्पना, संशोधन आणि व्यवसायाच्या संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. अशा प्रकारचे हे मराठवाड्यातील पहिलेच केंद्र आहे.
