एमजीएम आणि आयबीएममध्ये सामंजस्य करार संपन्न
छत्रपती संभाजीनगर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली आयबीएम कंपनी आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाचे शिक्षण, कौशल्यं व आंतरवासिता देण्याबाबत सामंजस्य करार झाला असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून हा प्रगत अभ्यासक्रम संयुक्त विद्यमाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयबीएम या विश्वविख्यात कंपनीशी करार करणारी एमजीएम ही मराठवाड्यातील पहिली संस्था आहे व त्यामुळे मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थी वर्गास जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण मिळणार आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या पुढाकाराने व आयबीएम – शिक्षण विभागाचे एशिया – पँसेफिक प्रमुख हरी रामा सुब्रम्हणीयन यांच्या सक्रिय सहयोगाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गतिमान बदलांना सामोरे जाऊ शकतील असे युवक घडविण्यासाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजिअन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आयओटी, क्वान्टम टेक्नॉलॉजी, क्वान्टम कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, बिग डेटा एनालिटिक्स, ऑग्मेन्टेड रियॅलिटी, व्हर्च्युअल रियॅलिटी या भविष्यदर्शी क्षेत्रात प्रवेश करण्यास पात्र युवक तयार करणे यामुळे शक्य होणार आहे.
यावेळी कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.हरिरंग शिंदे अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख,प्राचार्या डॉ.विजया मुसांडे, डॉ.परमिंदर कौर,राशी जैन, डॉ.शर्वरी तामणे, डॉ.संजय हरके, आयबीएमकडून आयबीएमचे सल्लागार संजीव मेहता, डेटागामीचे कार्यकारी संचालक धवल शहा, वरिष्ठ व्यवस्थापक श्वेता शहा व सर्व संबंधित उपस्थित होते.
