‘मेट्रो’ मुळे मुंबईकरांना झालेला आनंद संजय राऊतांना बघवत नाही का?
भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा खोचक सवाल
मेट्रो 3 ची सेवा उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे उशिरा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार सलग असते तर चार वर्षापूर्वीच मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती. चार वर्ष रखडलेला हा प्रकल्प देवाभाऊंनी सुरू केला. मेट्रो 3 मुळे मुंबईकरांना झालेला आनंद राऊतांना बघवत नाही का? असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईचा विकास कसा होत आहे, मेट्रो 3 कशी सुरू आहे, हे पाहण्यासाठी राऊतांनी सामना कार्यालयापासून बीकेसी पर्यंत मेट्रो तीन ने प्रवास करावा, वाटले तर राऊतांचे तिकीट मी काढतो, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.
“कॅबिनेट म्हणजे गुंडाची टोळी आहे” या राऊतांच्या टीकेचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की, आज ज्यांना गुंड म्हणत आहेत ते सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत. तुमच्या सोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते सज्जन होते का ? असा बोचरा सवालही त्यांनी केला. रामदास कदम, योगेश कदम तुमच्यासोबत असताना ते योग्य होते. बाळासाहेबांच्या वारशावर चालणाऱ्यांना ‘गुंड’ म्हणणे म्हणजे ठाकरे घराण्याचा अपमान आहे, असेही श्री. बन यांनी सांगितले.
निजामाची राजवट उबाठा राजवटीत होती
निजामाची राजवट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या काळात होती असे टीकास्त्र श्री. बन यांनी सोडले. सर्वसामान्य माणसाला लुटणे, सर्वसामान्य माणसाकडून शंभर कोटींची वसुली करणे, एक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून डोळा फोडणे, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बातमी दिली म्हणून घरी जाऊन पत्रकाराला अटक करणे याला निजामाची राजवट म्हणतात, असे श्री. बन म्हणाले.
रोहित पवारांच्या टँकरपासून व्यासपीठापर्यंत घायवळ आहे — तरी राऊत गप्प का?
रोहित पवार यांच्याबरोबर घायवळचे फोटो कालच सर्वांसमोर आणले आहेत. रोहित पवार यांच्या टँकरचे उद्घाटन असो किंवा प्रचार असो सर्वत्र घायवळ दिसतो. यावरून घायवळ कुणाचा कार्यकर्ता आहे, घायवळवर कोण मेहरबान आहे या सर्वांचे उत्तर महाराष्ट्राला मिळालेले आहे. गुंडांना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो आहे. घायवळ आणि रोहित यांच्याबद्दल श्री. राऊत मूग गिळून गप्प का आहेत असा सवालही श्री. बन यांनी केला.
