Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमेलडी क्वीन आशाताई   

मेलडी क्वीन आशाताई   

मेलडी क्वीन आशाताई   
           गेली सात दशके आपल्या स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि असंख्य संगीत प्रेमींच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जेष्ठ अष्टपैलू गायिका, मेलडी क्वीन  आशा भोसले  यांचा आज  वाढदिवस. आशाताईंचा आज ९२ वा वाढदिवस आहे असे सांगितले तर कोणाचा विश्वासही बसणार नाही. कारण आपल्या आवाजाप्रमाणे कायम चिरतरुण असणाऱ्या आशाताईंमध्ये आजही वीस वर्षाच्या तरुणीला मागे पाडेल एवढी ऊर्जा आहे. वयाच्या ९२ व्या  वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की आजही त्यांच्या आसपास कोणतीही गायिका फिरू शकत नाही. आपल्या सात दशकांच्या संगीत कारकिर्दीत त्यांना भारतरत्न सोडता सर्वच पुरस्कार मिळाले.  दोन वर्षापूर्वी २४ मार्च २०३३ रोजी  आशाताईंना  प्रतिष्ठेच्या  महाराष्ट्र भूषण पुरस्काराने महाराष्ट्र सरकारतर्फे गौरविण्यात आल्याने संगीत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.  मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी तेव्हाचे  उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. आशा भोसले यांनी गेली सत्तर वर्ष संगीत कलेची जी सेवा केली आहे त्याचीच  पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार.  ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशाताईंना संगीताचे बाळकडू त्यांच्या घरातच मिळाले. १९४३ साली माझा बाळ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या चला चला नव बाळा… या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला. वयाच्या पंधराव्या वर्षीच म्हणजे १९४८ साली हंसराज बहल यांच्या चुनरिया या चित्रपटात सावन आया हे गाणे गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.  १९५३ साली बिमल रॉय यांनी त्यांना आपल्या परिणिता या चित्रपटातील गाणी गाण्याची संधी दिली. या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. १९५४ साली राज कपूर यांनी बूट पॉलिश या चित्रपटात मोहम्मद रफी यांच्यासोबत नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है  गायला दिले. १९५६ साली सीआयडी हा चित्रपट आला या चित्रपटातील त्यांनी गायलेली सर्व गाणी गाजली. १९५७ साली आलेल्या नया दौर या चित्रपटातील गाणी तर खूपच लोकप्रिय झाली आणि सर्वत्र आशाताईंचे नाव झाले. आशाताई हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची गायिका म्हणून नावारूपास आल्या. त्या काळातील सर्वच संगीतकारांची गाणी त्यांनी गायली. मागील सत्तर वर्षात असा एकही संगीतकार नसेल ज्यांनी आशाताईंना आपल्यासाठी गाण्याची विनंती केली नसेल.  १९४८ पासून सुरू झालेला आशाताईंच्या  संगीत कलेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. आशा भोसले यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा विविध भाषेत सोळा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी एक हजारांहून अधिक चित्रपटासाठी गायन केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील गायनासाठी त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार  मिळाला आहे. २००० साली त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने तर २००८ साली मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २०११ साली सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला. त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. आशा भोसले यांनी सर्वप्रकारची गाणी गायली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर सुरवातीच्या काळात लता मंगेशकर यांचा वरचष्मा होता. तेंव्हा दुसऱ्या गायिकांना संधी मिळणे अवघड होते हे  ओळखून त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. ज्या प्रकारची गाणी लता मंगेशकर गायच्या त्या प्रकारची गाणी सोडून अन्य प्रकारची गाणी त्यांनी गायला सुरुवात केली. यात पॉप तसेच पाश्चिमात्य सुरावट असलेल्या गाण्यांचा समावेश होता. त्या गाण्यांनी युवकांवर मोहिनी घातली. त्यांनी गायलेले गझल, मुजरे आणि भजनेही लोकप्रिय झाली. संगीतातला कुठलाही प्रकार त्यांनी गायचा सोडला नाही. आशा भोसले यांनी अनेक भाषेत गाणी गायली असली तरी त्यांनी मराठीत सर्वाधिक गाणी गायली आहेत ते स्वाभाविकही आहे त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्यासाठी त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी, मी मज हरपून बसले ग ही त्यांची गाणी इतकी लोकप्रिय आहेत की अजूनही ती स्मरणात आहे. कुठल्याही कार्यक्रमात ही गाणी  अजूनही म्हटली जातात. त्यांनी गायलेली सर्वच गाणी लोकप्रिय झाली आहेत. जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या आशाताई म्हणजे आधुनिक काळातील एक आश्चर्य आहे. आशाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-श्याम बसप्पा ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments