मी तुकाराम बोलतोय…
छत्रपती संभाजीनगर/ राम कृष्ण हरी…मी देहूचा तुकाराम बोल्होबा अंबिले…माझा जन्म २२ जानेवारी १६०८ साली झाला. वडील बोल्होबा आई कनकाई आणि पत्नी आवडी. महादेव,विठोबा,नारायण,भागुबाई हे मुले. व्यवसाय-शेती,दुकानदारी आणि घरात महाजन सावकारी होती…१९ मार्च १६५० रोजी माझा इहलोकीचा प्रवास संपला…हा झाला माझा संक्षिप्त परिचय. असे म्हणतात कि,माणसाने स्वत:चा परिचय स्वत: करून देणे हि काही आपली संस्कृती नाही. परंतु एखाद्या सज्जन माणसाने स्व:ताची ओळख करून देणे हा एक चांगला प्रघात नाही का? मी आज पर्यंत अभंग गाथेच्या माध्यमातून आपणास परिचित आहेच. अभंग आणि शब्द हेच माझे सर्वस्व होते. त्याचाच मला आयुष्यभर आधार राहिला होता…
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्रे यत्न करू ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहे शब्दचि हा देव शब्देची गौरव पूजा करू ॥३॥
शब्दाचे धन घेऊन पांडुरंगाचे नामस्मरण करत मी लोकांना ज्ञानाचे,अभ्यासाचे महत्व पटवून दिले. प्रयत्नाची शिकस्त केली तर यश हमखास मिळतेच असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे… मंडळी मी काही माझा मोठेपणा सांगायला किंवा उपदेश करायला आलो नाही. तर मी आलोय आपल्याशी मन मोकळा संवाद साधायला…मी माझ्याच मनाशी संवाद साधून,स्वतःशी वाद करून मार्गक्रमण करत आलो. परंतु आता प्रत्यक्ष हितगुज साधन्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय…त्याला कारणही तसेच आहे बरं का? अहो, किती दिवस तुम्ही आपल्या सोयीनुसार माझ्या जीवनाचा,अभंगांचा अर्थ काढणार आहात. कधीतरी डोळसपणे अंतर्मुख होऊन विचार करणार आहात कि नाही…नवीन पिढीला फक्त ऐकीव तुकाराम सांगणार का? एक सच्चा माणूस,विठ्ठल भक्त आणि जनकल्यानासाठी प्रस्थापित व्यवस्थेशी केलेला संघर्ष त्यांना कधी कळणार? माझ्या हयातीत अनेक संकट मी ओढवून घेतले. अभ्यास करून विचारांती काही गोष्ठी ठरवल्या त्या बरहुकूम मी वागण्याचा प्रण केला.पण कशासाठी? आणि का…? कदाचित आजच्या संवादातून माझ्याबद्दलच्या काही गोष्ठी नक्की स्पष्ट होतील अशी अपेक्षा.
मला आठवते…वयाच्या २० व्या वर्षी भांबनाथाच्या डोंगरावर जाऊन चिंतन मनन केले.सत्य असत्याशी मन ग्वाही केले. निश्चय केला आणि मनाशी ठरवले…तत्कालीन जीवघेण्या दुष्काळाने लोकांचे जगणे कठीण केले होते.मानवासह पशु,पक्षी अन्न पाण्यावाचून तडफडून मृत्युमुखी पडताहेत. अशावेळी कोणत्याही संवेदनशील माणसाला मायेचा पाझर फुटणार नाही तर काय? दुष्काळाने पिडा केली तर तो निसर्गाचा कोप पण माणसाने माणसावर कोप करावा म्हणजे हा अन्याय आहे. अज्ञानापायी अनिष्ट रूढी-परंपरा पाळणारे,छळणारे तर वेगळेच मग तिथे कैचा देव? या सगळ्या प्रकाराने व्यथित होऊन मी माझ्याकडील दुष्काळग्रस्त गरीब शेतकऱ्यांचे गहान कर्जखते इंद्रायनीत बुडवण्याचा मानवतावादी निर्णय घेतला. आजचे तुमच्यासारखे व्यवहारी,हिशोबी लोकं मला मूर्ख किंवा बावळट म्हणतील काहींनी तसा प्रचार देखील केला. पण खरे सांगतो तो माणसं जगवण्याचा माझा क्रांतीकारी निर्णय होता. म्हणतात ना कुठल्याही कार्याचा प्रारंभ एका पाऊलाने तर होत असतो. त्यानंतरची हजारो पाऊले त्या कार्याला उंचीवर घेऊन जातात. सकारत्मक उद्देशाने केलेली कर्जमुक्तीची कृती मला जीवनाची दिशा दाखवणारी ठरली…उद्दात मानवी हेतूने कर्जाची कागदपत्रे नष्ट करून सामाजिक परिवर्तनास सुरुवात केली. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणुनी कळवला येत असे..मला सर्व काही सुख,ऐश्वर्य असतानाच विठ्ठल भक्तीकडे वळलो त्याचे कारण हेच आहे. मी काही अन्नाला महाग झालो नव्हतो. मी वेदांचाही अंकित नव्हतो, सर्वांच्या ठीकाणी समत्व पाहणे, सर्वाच्या शरीरावरील चर्म व हाड, मांस एकसमान असतांना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गुळ घ्यायचा असेल तर त्याची जात कशाला विचारायची? गावाचा मोकाशी हलक्या जातीचा असला तर त्याची आज्ञा मानायची नाही का?
सोवळ्या ओवळ्याच्या परंपरागत कल्पना तर घातकच आहे. जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा आणि तिच नैतिक कसोटी आहे. बाकीचे सगळे थोतांड आहे. पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठायीचेचि अशी माझी धारणा आहे…माझा तुम्हाला एक खडा सवाल आहे कि…नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती…? अहो,विधिनिषेध, यज्ञ, श्राद्ध, पूजा, भविष्यकथन, शुभाशुभ, नवस, कौल, योग, समाधी, उपवास, तीर्थयात्रा, वनवास, गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष, यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुध्द भावना व शुद्ध आचारण यानांच खरे महत्व आहे.माझा ईश्वर हा पारलौकिक मुल्यांवर नव्हे तर माणूसकरीवर आधारलेला आहे. रंजल्या- गांजल्या लोकांना जो आपले मानतो तोच खरा साधू, तोच देव अशा साधूमध्ये ईश्वर असतो. असा संत माणूस आपल्या घरी आला तर तो क्षण सणासारखा साजरा करावा.त्याची पूजा म्हणजेच ईश्वराची पूजा ठरते.सांगायचा मुद्दा असा कि, माझ्या संकल्पनेतला देव माझा विठ्ठल मी आसाच पाहत आलो.समाज व्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण करण्यासाठी मला रात्र आणि दिवस संघर्ष करावा लागला.काही मानवी मूल्य जपत हाती घेतलेले व्रत आयुष्यभर सांभाळले.यामुळेच एका प्रबळ शोषक वर्गाच्या वैराचा,विरोधाचा ज्वालामुखी स्वत:च्या अंगावर ओढवून घेतला…
रात्री दिवस आम्हां युध्दाचा प्रसंग अंतर्बाहय जग आणि मन ॥१॥
जीवाही आगोज पडती आघात येऊनिया नित्य नित्य करी ॥२॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे अवघीयांचे काळे केले तोंड ॥३॥
माझ्या अल्प आयुष्यामध्ये मला प्रस्थापित-धर्मांध,वर्णाभिमानी शोषकांच्या विरोधात अहोरात्र संघर्ष करावा लागला. देव, धर्म शास्त्र यांचा आधार घेऊन भोळ्या भाबडया लोकांना भिती दाखवून लुबाडणाऱ्या भामट्यांशी मी दोन हात केले. किर्तन हा माझा श्वास आणि तेच माझे क्रांतीकरी परिवर्तनाचे माध्यम ठरले. समता ज्याच्या ठायी आहे तो सर्वांचा ‘विठ्ठल’ माझा प्रेरणास्रोत,मायबाप होता. त्यानेच कधी कुणाला दूर केले नाही, सर्वाना पोटाशी धरले. मी त्याचाच पाईक म्हणूनच माझ्या वाणीत आणि करणीत कधीच फरक दिसणार नाही.विचारात आणि आचरणात विसंगती असेल तर विशिष्ट मुल्यांसाठी संकटाना अंगावर घेता येत नसते. काळाच्या कसोटीवर टीकणारे,जनउपयोगी निर्णय अंमलात आणण्यासाठी सत्य नेहमी पारखून घेतल पाहिजे…
सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता…
आपले अंतर्मन काय म्हणते तेच करावं…यासाठी सर्वांनी विवेकाच्या अंगाने धर्मशास्त्राची चिकित्सा करायला सुरुवात केली तर माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल. आपल्या जीवनात आनंद भरण्याकरिता, भयमुक्त जगण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी इतरांनी आपल्या स्वार्थासाठी लादलेले बंधने झुगारली पाहिजे. आपल्या जीवनातील यश आणि कीर्तीत आई वडीलांचा अत्यंत मोलाचा वाटा असतो त्यामुळे आई-वडीलाच्या विषयी कृतज्ञभाव कायम ठेवला म्हणजे ईश्वर तुम्हांला मिळालाच म्हणून समजा…त्याला लागतो केवळ शुद्ध भाव आणि पवित्र मन…कारण आई वडीलांची सेवा ईश्वराच्या,पांडुरंगाच्या सेवे समान असते…
काय काशी करिती गंगा । भीतरी चांगा नाही तो
माय बापे केवळ काशी । तेणे न वजावे तीर्थाशी
आई वडिलांची मनोभावे सेवा आणि विठ्ठलाचे नामस्मरण केले कि दुसरे कोणतेच कर्मकांड करायची गरज नाही…कुठल्या तीर्थक्षेत्राला जाण्याची,सन्यास घेण्याची अजिबात गरज नाही…नाहीतर देवाच्या नावाखाली अनेक ढोंगी साधू,महाराज आपल्या स्वार्थासाठी तुमच्या भावनेशी खेळतात,छळतात शोषण करतात…अंगा लावूनिया राख डोळे झाकून करिती पाप त्यांना ईश्वराशी काही देणे घेणे नसते…
टीळा टोपी घालूनि माळा म्हणती आम्ही साधू
दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू
तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडूरंग
त्यामुळे तुम्ही ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघा, मन प्रसन्न ठेवा पांडूरंग तुम्हांला कुठेच काही कमी पडू देणार नाही. आपले कर्म हेच आपले तारण असते.मी तर काही चमत्कार जाणत नाही.चमत्कार्यानां मानतही नाही…अंतकरणाने विठ्ठलाचे नांव घेतले की, पुरे आहे. तेहतीस कोटी देव त्याच्या ठायी आहेत…मग इहलोकीचे भोग भाणि परलोकीचा मोक्ष यांची चिंता कशाला करायची? खरंतर मी विठ्ठलाला निक्षून सांगितले की, मला मोक्षपद देऊ नको तर सज्जनाचा/संताचा सहवास अखंड मिळू दे.यातच माझं सुख सामावलेले आहे…एके दिवशी माझा सखा पाडूरंग संत नामदेवासह स्वप्नात आला. आणि मला आदेश देऊन गेला…सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलो नको म्हणून तर मी या कामाला लागलो…तसे माझे यात काहीच नाही जे काही आहे ते सगळे मायबाप पांडुरंगाचे आहे…माझ्या मुखे मज बोलवितो हरि,बोलविले बोल पांडुरंगे…आणखी एक सत्य तुम्हांला सांगतो माणसाने आपले कर्तव्य व जबाबदरी प्रामाणिकपणे सांभाळली आणि केलेलं काम ईश्वराला समर्पित केले तर त्याचा व्यापक विधायक लाभ नक्की मिळतो. शिवाय आपणही ईश्वरावर अवलंबून राहू नये नाहीतर आपण दुबळे होऊन जाऊ…त्यासाठी एकच काम करायचे…
आहे ऐसा देव वदवावा वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा.
देव आहे असे वाणीने वदवावे पण मनामध्ये मात्र देव नाही, असा अनुभव घ्यावा. यातूनच मनुष्य स्वालंबी होऊन आपल्यातील पंगुत्वावर मात करू शकतो…आपल्या संसार व्यवहारात माणसाला अपार कष्ट करावे लागतात. आघात पचवावे लागतात. संकटे झेलावी लागतात. जो या संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडतो आणि यशस्वी होतो त्याचा गौरव होतो, त्याला लोकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळते. आणि जो संघर्षात टीकाव धरु शकत नाही. तो समाजाच्या तिरस्काराचा, चेष्टेचा विषय होत असतो. त्यामुळे माणसाने अपार निर्मितिक्षमता आणि मानवी प्रयत्ना वरची त्यांची अतूट निष्ठा दाखवत असते. जीवनात संघर्ष करतांना आधी आपली भूमिका निश्चित केली पाहिजे आणि ध्येयप्राप्तीसाठी मरणालाही सामोरे जाण्याची मनाची तयारी असली पाहिजे…टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपणाचा आकार येत नसतो…विठ्ठलाच्या आशीर्वादाने जनप्रबोधन केल्यामुळे,वेदांचा अर्थ समजून घेत कीर्तन केल्यामुळे, कर्मट लोकांनी माझ्यावर धर्मपीठात खटला दाखल केला होता.विषमतेचे समर्थन करणाऱ्या मंडळीने माझ्यावर आरोप लावले. पण मी डगमगलो नाही.कारण मी चुकीचे काहीच केले नव्हते.त्यांना धर्मसभेत ठणकावून सांगितले…मी वेदाचा अमृतानुभव अनुभवला आणि प्रसाद म्हणून तो वाटूनही टाकला. त्यात मी काहीच पाप केले नाही. ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना असताना तुम्ही त्यावर बंधने घालणारे कोण? त्याने कधी भेद केला नाही मग भेद करणारे तुम्ही कोण? ईश्वरासमोर सगळे समान असतांना त्यात भेदा भेद करणारे तुम्ही कोण? कुणाचाही भेद,मत्सर किंवा हेवा करू नका हिच तर ईश्वराची शिकवणूक आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आईका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुख जीव भोग पावे ॥४॥
मंडळी आता तुम्ही म्हणाल तुकाराम संवादाच्या बहाण्याने आला आणि कीर्तन करू लागला. उपदेश करून निघून चालला पण असे मुळीच नाही बरं कारण मी कुठेच जात नाही तर संत सज्जनाच्या सहवासात कायम असतो…माझे विचार आजही विठ्ठल कृपेने तसेच अमृताच्या धारा वाहणारे ठरतील जर तुम्ही ते आचरणात आणले तर…चला सध्या पांडुरंगाच्या भेटीसाठी,दर्शनाकरिता लाखो वारकरी दिंडीच्या सोहळ्यात हरीनामाच्या गजरात भानुदास-एकनाथ…ज्ञानोबा-माऊली-तुकाराम यांच्या नावांचा घोष करत पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत…तेव्हा तुम्ही सुद्धा विठ्ठलाचे नामस्मरण करून त्याला आनंद देणाऱ्या विधायक कामाची सुरुवात करा आणि मला निरोप द्या…
जय हरि विठ्ठल….
आनंदाचे डोहीं आंनंद तरंग आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगू जाले काहीचिया बाही पुढे चाली नाही आवडीने ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा सोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासा ठसा अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
लेखक:- रमेश काकासाहेब शिंदे
