Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादघनसावंगी मतदारसंघात १६ उपकेंद्रांना अतिरिक्त रोहित्र मंजूर – शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा!

घनसावंगी मतदारसंघात १६ उपकेंद्रांना अतिरिक्त रोहित्र मंजूर – शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा!

घनसावंगी मतदारसंघात १६ उपकेंद्रांना अतिरिक्त रोहित्र मंजूर – शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्याचा दिलासा!

आमदार हिकमत उढाण यांच्या प्रयत्नांना यश
घनसावंगी/प्रतिनिधी/  घनसावंगी तालुक्यातील विजेचा ताण कमी करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आमदार हिकमत उढाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे घनसावंगी मतदारसंघातील १६ विज उपकेंद्रांसाठी अतिरिक्त रोहित्र मंजूर करण्यात आले असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तालुक्यातील गोदावरी व दुधना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि विजेची मागणी गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. शेतीतील आधुनिक साधनसामग्री, मोटारी, पंप, ठिबक व फवारणी यंत्रणा या सर्वांसाठी अखंडित विजेची आवश्यकता असते. मात्र, विजेच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या हंगामात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार हिकमत उढाण यांनी ठोस पावले उचलली.
आमदार उडाण यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत घनसावंगी मतदारसंघातील विज उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत १६ विज उपकेंद्रांसाठी अतिरिक्त रोहित्र मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात सर्वाधिक अतिरिक्त रोहित्र मंजुरीचा मान घनसावंगी मतदारसंघाला मिळाला आहे.
या मंजुरीत घनसावंगी विज उपकेंद्रासाठी १० मेगावॉट क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र मिळाले असून, भोटेपुरी, शाहगड, एकलेहरा, देवडी, हडगाव, सिंदखेड, शिवणगाव, जिराडगाव, रामनगर, वडगांवगिरी, सुखापुरी, चंदनपुरी, साडगाव, बाणेगाव, पिंपळखेड आणि अंतरवाळी टेपी या १५ विज उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ५ मेगावॉट क्षमतेची अतिरिक्त रोहित्र मंजूर झाली आहेत.
या उपक्रमामुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील विज पुरवठा सुलभ, स्थिर आणि अखंडित होण्यास मोठी मदत होणार आहे. विजेचा ताण कमी झाल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सिंचन सुविधा अधिक सक्षम होईल. त्यामुळे बागायती शेतीचा विस्तार, ऊस, भाजीपाला, फळबागा यांसारख्या पिकांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचा उत्पन्नस्तर वाढविण्यास मोठा हातभार लागेल.
आमदार हिकमत उढाण यांच्या या प्रयत्नांचे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि सर्व समाजघटकांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक व्यक्त केले जात आहे. घनसावंगी मतदारसंघाच्या विकासासाठी विज, पाणी आणि रस्ते या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी केलेले हे यशस्वी प्रयत्न आता ग्रामविकासाच्या वाटचालीला नवे बळ देणार आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments