मराठी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद येथील मराठी माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. विद्यालयातील वर्गांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी फुलांची आरास, फलक लेखन व रंगीबेरंगी सजावटीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रास्ताविकात शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. गेल्या दहा वर्षांतील त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यात आला.
मुख्याध्यापक संजय ठुबे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना जीवनात मोठी स्वप्ने बाळगण्याचा सल्ला दिला. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे त्यांनी सांगितले. “यश हे मेहनतीचे फळ असते. सातत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे कोणतीही उंची गाठता येते,” असे ते म्हणाले. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. काही विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोपगीत सादर केले. तसेच नृत्य, गीते, कविता व लघुनाटिकांमुळे कार्यक्रमात रंगत आली.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुढील वाटचालीची उमेद आणि डोळ्यांत शालेय जीवनाच्या गोड आठवणी दिसत होत्या. निरोप समारंभामुळे विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला अनेक महापुरुषांचे फोटो भेट देत शाळेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रविण डघळे, कलीम शेख, सुनिल पाटील, आण्णासाहेब निकम,कैलास कांजूने, राजु बारगळ आदीसह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
