मंठा पोलीस ठाण्यात वाळू हप्त्यासाठी पीआय आणि अंमलदाराने मांडला होता ‘बाजार’;
३० हजारांच्या लाचेसह दोघांनाही ठोकल्या बेड्या!
आत्ताच एक्सप्रेस
जालना/प्रतिनिधी/ रक्षणकर्तेच जेव्हा ‘भक्षक’ बनतात, तेव्हा काय होतं याचा प्रत्यय जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात आला आहे. वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी चक्क ‘महिन्याचा हप्ता’ मागणाऱ्या पोलीस निरीक्षक (PI) आणि एका अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलातील ‘हप्तेखोर’ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस की वसुली एजंट?
वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एका ३८ वर्षीय तक्रारदाराच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी ५०,००० रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. “गाडी चालवायची असेल तर हप्ता द्यावाच लागेल,” अशी तंबी देत आरोपींनी आधीच १०,००० रुपये लाटले होते. उरलेल्या ४०,००० रुपयांसाठी या ‘खाकी’ वर्दीतील वसुली बहाद्दरांनी तक्रारदाराच्या मागे तगादा लावला होता.
पीआयचा अजब ‘ऑफर’ आणि सापळा!
एसीबीने जेव्हा या प्रकरणाची पडताळणी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी तक्रारदाराला एक अजब ऑफर दिली होती. “जर तू अवैध वाळूच्या इतर दोन गाड्या पकडून दिल्यास, तुला तुझ्या गाडीच्या हप्त्यात सूट दिली जाईल,” असे आमिष दाखवून त्यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले. तर दुसरीकडे, पोलीस अंमलदार रवी जाधव याने स्वतःचे ‘वरचे’ ५,००० रुपये वाढवून एकूण ५५,००० ची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर ३०,००० रुपये देण्याचे ठरले.
गोपनीय शाखेतच पडला ‘सापळा’!
नेहमी गुन्हेगारांना पकडणाऱ्या मंठा पोलीस ठाण्यातील ‘गोपनीय शाखेत’ गुरुवारी दुपारी वेगळंच नाट्य घडलं. तक्रारदाराकडून ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना अंमलदार रवी जाधव याला एसीबीच्या पथकाने झडप घालून पकडले. यावेळी लाच घेण्यास प्रोत्साहन देणारे पीआय मनोज कुमार राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांच्याही हाताला आता लाचेचे ‘काळे’ लागल्याने त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मुख्य आरोपींची कुंडली:
- आरोपी १: मनोज कुमार राठोड (पोलीस निरीक्षक, वर्ग १) – रा. उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर.
- आरोपी २: रवी गणपत जाधव (पोलीस अंमलदार, ब.नं. ७८८) – रा. पोलीस क्वार्टर, जालना.
कारवाईचे पथक:
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, उपअधीक्षक बाळू जाधवर आणि त्यांच्या टीमने (हवालदार सिनकर, नागरगोजे, बागुल) यशस्वी केली.
