मंजूर नियोजनाप्रमाणे खताचा पुरवठा करावा जेणेकरुन खतांची नियमित उपलब्धता राहील – जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ
जालना/ जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमिवर खते आणि बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. तसेच पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते उपलब्ध होतील असे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला आणि कृषी विभागाला दिले आहे. तरी सर्व खत उत्पादक कंपन्यांना कृषि आयुक्तालयामार्फत मंजूर नियोजनाप्रमाणे खताचा जिल्ह्यात पुरवठा करावा जेणेकरुन यामुळे खतांची नियमित उपलब्धता राखली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी संबंधितांना बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच कृषी विभाग आणि खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी विकास अधिकारी श्री.बनसावडे, कृषी उपसंचालक व कृषि विभागातील इतर संबंधीत अधिकारी तसेच सर्व रासायनिक खत उत्पादक कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्याकडून रासायनिक खत उपलब्धता व पुरवठ्याबाबत आढावा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 21 हजार 196 मे.टन युरिया, 5 हजार 218 मे.टन सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) आणि 43 हजार 314 मे.टन एनपीके संयुक्त इतका रासायनिक खतांचा साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे यांनी दिली. जिल्ह्याला कृषि आयुक्तालयाकडून 22 हजार 4031 मे.टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. माहे जून-2025 अखेर एकूण 97 हजार 285 मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आज अखेर 71 हजार 25 मे.टन खत उपलब्ध झालेला आहे. आज रोजी जिल्ह्यात एकूण 94 हजार 889 मे.टन एवढा रासायनिक खताचा साठा उपलब्ध आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना डीएपी खताला पर्यायी इतर खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. डीएपीच्या जागी एसएसपी आणि युरिया यांचा योग्य प्रमाणात वापर करून पिकांची पोषणमूल्ये पूर्ण केली जाऊ शकतात, ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांसह खरीप हंगामासाठी लागणारे सर्व प्रकारचे बियाणे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यात विविध वाणांचे एकूण 13.61 लक्ष कापूस बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी एखाद्या विशिष्ट वाणाचा अनावश्यक आग्रह धरू नये. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रमाणित आणि सुधारीत वाणांची निवड करावी, जेणेकरून वेळेवर पेरणी पूर्ण होऊन चांगल्या उत्पादनाची खात्री करता येईल असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले वाण निवडणे नेहमीच फायदेशीर ठरते.
शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदी करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी :
केवळ परवानाधारक, अधिकृत कृषी सेवा केंद्र किंवा विक्रेत्यांकडूनच खते व बियाणे खरेदी करावीत. पक्के बिल/पावती : प्रत्येक खरेदीसाठी पक्के बिल किंवा पावती घेणे बंधनकारक आहे. या पावत्यांवर खत/बियाण्याचा प्रकार, वाण, कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन व अंतिम मुदत तारीख स्पष्टपणे नमूद असल्याची खात्री करावी. ही पावती भविष्यात गुणवत्ता किंवा इतर कोणतीही समस्या उद्भवल्यास पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल..
जादा दर आकारणी : जर कोणी विक्रेते खते किंवा बियाण्यांसाठी ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारत असतील. कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील अथवा अनुदानित रासायनिक खतासोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती करत असतील तर तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समितीच्या कृषि विभागाशी अथवा जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या 8275051401 या क्रमांकावर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
