Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबादमजुरीच्या पैशावरून तिसगाव तांड्यात दोन गटांत 'राडा'; महिलांसह वृद्धांना अमानुष मारहाण,दोन्ही बाजूंनी...

मजुरीच्या पैशावरून तिसगाव तांड्यात दोन गटांत ‘राडा’; महिलांसह वृद्धांना अमानुष मारहाण,दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

मजुरीच्या पैशावरून तिसगाव तांड्यात दोन गटांत ‘राडा’; महिलांसह वृद्धांना अमानुष मारहाण,दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

​खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील तिसगाव तांडा येथे मजुरीच्या पैशांच्या वाटपावरून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.या वादात दोन्ही बाजूंकडील सदस्य जखमी झाले असून,महिला आणि वृद्धांनाही अमानुष मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
​या वादाची ठिणगी मजुरीच्या पैशांवरून पडली.सुनील साहेबराव राठोड यांचा गव्हाचा भुसा वाहतुकीचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे लहु कैलास राठोड हा मजूर म्हणून काम करतो.लहुचे वडील कैलास राठोड आणि भाऊ अंकुश राठोड यांचे म्हणणे होते की, लहु मजुरीचे पैसे मद्यपानावर खर्च करतो,त्यामुळे ते पैसे त्याला न देता त्याच्या पत्नीकडे किंवा वडिलांकडे द्यावेत.मात्र, ‘जो कामाला आहे त्यालाच पैसे देणार’ अशी भूमिका सुनील राठोड यांनी घेतल्याने गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही कुटुंबांत तणाव होता. मात्र
​गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुनील आणि लहु यांच्यात गावात पैशांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर दुपारी ३:३० ते ४ च्या दरम्यान वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. अंकुश राठोड हे आपल्या कुटुंबासह सुनील यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता, दोन्ही गटांत शिवीगाळ सुरू झाली. बघता बघता दगड, लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला. महिला व वृद्धांनाही लक्ष्य केले
​या हाणामारीत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या. सुनील राठोड यांच्या गटातील सुनीता, रोशनी आणि वृद्ध आई कौशल्याबाई यांना दुसऱ्या गटाकडून मारहाण करण्यात आली, तर अंकुश राठोड यांच्या गटातील आई सरस्वती आणि वडील कैलास राठोड यांनाही सुनीलच्या कुटुंबाकडून अमानुष मारहाण झाली.महिलांचे केस ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले, तर वृद्धांना धक्का देऊन पाडण्यात आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दगड आणि काठीच्या प्रहाराने दोघे गंभीर जखमी ​या संघर्षात दोन्ही गटांतील मुख्य व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.अंकुश राठोड याने सुनील यांच्या तोंडावर दगड मारल्याने ते जखमी झाले, तर प्रत्युत्तरात सुनीलने लाकडी काठीने अंकुशच्या डोक्यावर प्रहार केल्याने अंकुशचे डोके फुटून तो रक्ताळलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला. हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील ग्रामस्थांनी धाव घेत मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस कारवाई आणि तपास
​घटनेनंतर जखमींना तातडीने खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोहर पुंगळे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे तिसगाव तांडा परिसरात खळबळ उडाली होती मात्र तणावपूर्ण शांतता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments