माजी सरपंच सय्यद इलियास यांनी इफ्तार पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश
खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथे माजी सरपंच सय्यद इलियास यांच्या सहा वर्षीय भाचा नोमान खान याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केल्याच्या आनंदानिमित्त मंगळवारी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन हाफिज याहया दर्गा येथे करण्यात आले. या निमित्ताने गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश अंभोरे, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद,डॉ. मकसूद पटेल,सय्यद रफीक, द्वारकादास घोडके,दिनेश सावजी, विजय चौधरी यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी माजी सरपंच सय्यद इलियास यांचे कौतुक केले.
मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित या इफ्तार पार्टीने सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश दिला.विविध जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन सामूहिकपणे उपवास सोडण्याचा हा क्षण गावकऱ्यांसाठी अनोखा ठरला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी धार्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्यावर आपली मते मांडली.डॉ.मकसूद पटेल यांनी सलोखा आणि सहिष्णुतेच्या महत्त्वावर भर दिला.
सुलीभंजन गावात हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे वातावरण कायम राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत प्रमुख अतिथींनी व्यक्त केले. गावातील नागरिकांनी सांगितले की, या इफ्तार पार्टीमुळे केवळ धार्मिक समारंभातच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही परस्पर सहकार्य आणि सौहार्दाची भावना दृढ होईल.कार्यक्रमाच्या शेवटी गाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सय्यद रफिक यांनी उपस्थित प्रमुख अतिथी व सर्व मान्यवरांचे आभार मानले. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सुलीभंजन ग्रामस्थांनी धार्मिक ऐक्य आणि मानवतेचा सुंदर संदेश दिला.
