महात्मा फुले यांच्या कार्याने समाजाला आधुनिक विचार दिला
पाचोड :- येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गांधी बानायत उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. गांधी बानायत यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मुलींसाठीची पहिली शाळा तसेच अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा सुरू करून फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समाजात विज्ञाननिष्ठ विचार रुजवले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण केली, तर ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या समस्या समाजासमोर मांडल्या.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी महात्मा फुले यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुले यांनी लावला तसेच शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा त्यांनी रचला. समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती आणि परंपरांवर प्रहार करत फुले यांनी आपल्या लेखणीतून समाजसुधारणेचा मार्ग दाखवला आणि आधुनिक विचारांची दिशा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. हेमंतकुमार जैन यांनी मानले यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव, डॉ. सुरेश नलावडे, डॉ. विलास महाजन, डॉ. उत्तम जाधव, डॉ. सुभाष पोटभरे, दादासाहेब एखंडे, आप्पासाहेब नेमाने यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.