शिवाची महान रात्र म्हणजेच महाशिवरात्री
महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमधील एक महत्वाचा सोहळा आहे. भारतीय संस्कृतीत एके काळी वर्षभरात ३६५ सण साजरे केले जात असत. दुस-या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे ३६५ सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती. उदा. पेरणी, लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता. परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे.
प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभरात येणा-या १२ शिवरात्रींपैकी फेब्रुवारी-मार्च मध्ये येणा-या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशाप्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचे एक उधाण निर्माण होते. हा असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे ढकलत असतो. याचाच वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण एक विशिष्ट सण स्थापित केला आहे, जो रात्रभर चालतो. या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊ देण्यासाठी, रात्रभर चालणा-या या उत्सवाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे आपण रात्रभर आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे.
जे लोक अध्यात्मिक मार्गावर आहेत, त्यांच्यासाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी देखील ती अतिशय महत्त्वाची आहे. कुटुंबात रममाण होणारे व्यक्ती हा दिवस शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात करून विजय मिळविल्याचा दिवस म्हणून साजरा करतात.
पण संन्यासी अर्थात योगी लोकांसाठी शिव कैलास पर्वतासोबत एकरुप झाल्याचा दिवस आहे. तो पर्वतासारखाच पूर्णपणे अचल म्हणजेच स्थिर झाला. यौगिक परंपरेत शिवाला देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु म्हणजे ज्यांच्यापासून योगशास्त्राची उत्पत्ती झाली ते प्रथम गुरु असे मानले जाते, अनेक सहस्त्र वर्षे ध्यानावस्थेत राहिल्यानंतर एक दिवशी ते पूर्णपणे निश्चल म्हणजे स्थिर बनले, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यांच्या सर्व हालचाली थांबल्या आणि तो पूर्णपणे अचल झाला, म्हणून संन्यासी लोक महाशिवरात्रीला निश्चलतेची अर्थात स्थैर्याची रात्र मानतात.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि रात्रीला इतके महत्त्व दिले जाते. याचे कारण ही रात्र साधकाला उच्च अध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांतून गेले आहे आणि आज अशा टप्प्यावर पोहोचले आहे की जिथे ते आपल्याला हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे की आपल्याला जीवन म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, आपल्याला भौतिक पदार्थ आणि अस्तित्व म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट, आपल्याला ब्रह्मांड आणि आकाशगंगा म्हणून माहित असलेली प्रत्येक गोष्ट फक्त एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होते.
समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्त्वाची मानली जाते. याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणा-या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहे की ज्याला आपण जीवन असे म्हणतो. आपल्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, आपल्याला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे.
प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील ऐक्य जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र आपल्याला उपलब्ध करून देते.
भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल किंवा जीवन चांगले घडवण्याबद्दल नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच “हे प्रभू, मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेन” अशा होत्या. म्हणून शिवरात्री जी महिन्यातली सर्वात काळोखी रात्र आहे, ती प्रत्येक मानवासाठी त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची, सृष्टीच्या उगमाची अमर्यादता अनुभवण्याची संधी आहे, जी प्रत्येक मानवामध्ये बीजरुपात उपस्थित असते.
महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे. ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे. एकीकडे शिव संहारक म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो. तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखला जातो. योग पुराणात शिवाच्या कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत. त्याचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि त्याचवेळी विचित्र आहे. त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे. ही शून्यतेची जिला आपण शिव म्हणतो, तिची विशालतेची आपल्याला एका क्षणासाठी तरी जाणीव व्हावी. ही रात्र आपल्यासाठी फक्त जागरणाची रात्र नाही, तर जागृतीची रात्र होवोत हीच सदिच्छा..!
-सुनील शिरपुरे