Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादशिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा - महापौर वंदना मगरे

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा – महापौर वंदना मगरे

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा महापौर वंदना मगरे

चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान

–         उपमहापौर राजेश राऊत

 

  • शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!
  • गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

 जालना :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरात दि.18 आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे,  सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. जालना शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याचे स्मरण व्हावे आणि तो वारसा जपला जावा, याच मुख्य हेतूने या दोन दिवसीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी शिवरायांना अभिवादन करत सर्व जालनेकरांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही शिवरायांच्या शौर्याच्या अनेक गाथा मांडल्या जाणार असल्याने जालनेकरांनी या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments