महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग धावला महावितरणच्या मदतीला
कायमस्वरूपी खंडित जोडण्यांचे वीजबिल भरून घेतला अभय योजनेचा लाभ
छत्रपती संभाजीनगर : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित वीजग्राहकांसाठी महावितरणने राबवलेल्या अभय योजनेस महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने वीजबिल भरून प्रतिसाद दिला. महानगरपालिकेने 2 कोटी 48 लाख व सार्वजनिक बांधकाम विभागाने 59 लाख रुपयांचे वीजबिल अदा करून व्याज व दंडमाफीचा लाभ घेतला. मनपा प्रशासक जी.श्रीकांत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकाडे व महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचे फलित म्हणून ही रक्कम महावितरणला मिळाली.
पथदिवे व इतर कार्यालये मिळून महानगरपालिकेच्या 246 जोडण्यांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी कायमस्वरूपी खंडित झालेला होता. थकबाकीची रक्कम जवळपास पावणेचार कोटी रुपयांच्या घरात होती. ही थकबाकी भरून घेण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. व्याज व दंड माफीची सवलत मिळणाऱ्या अभय योजनेचे महत्तव पटवून दिले. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अभय योजनेचा लाभ घेण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मन वळवण्यात यश मिळवले. मनपा प्रशासक जी.श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता अविनाश देशमुख, कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड, रोखपाल संजय महेर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन वीजबिल भरण्यास प्रतिसाद दिला. महावितरणच्या वतीने व्यवस्थापक (वित्त व लेखा) नितीन पाडसवान, उच्चस्तर लिपिक अजित साळवे यांनी मनपाकडे पाठपुरावा केला. मनपाने 26 मार्च रोजी 2 कोटी 48 लाख रुपये महावितरणकडे वळती करून अभय योजनेत जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या व्याज व दंडमाफीचा लाभ मिळवला.
नवीन प्रशासकीय संकुलासाठी गतवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत असलेली लेबर कॉलनी जमीनदोस्त करण्यात आली. हे करताना रहिवाशांच्या वीजजोडण्यांचा वीजपुरवठा महावितरणच्या वतीने कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला होता. जवळपास 85 लाख रुपयांची थकबाकी होती. महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, सहायक अभियंता इरफान खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकाडे यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार थकबाकीच्या ठिकाणी नवीन वीजजोडणी देता येत नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांना अभय योजनेचे महत्त्वही पटवून दिले. त्यावर कातकाडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वीजबिल भरण्याचे तयारी दर्शवली. अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांनीही पुढाकार घेत वीजबिलाची रक्कम अभय योजनेच्या अंतिम मुदतीच्या आत 31 मार्च रोजी महावितरणकडे वळती केली. 59 लाख रुपयांचे वीजबिल भरून अभय योजनेत 26 लाख रुपयांच्या व्याज व दंडमाफीचा लाभ सार्वजनिक बांधकाम विभागास मिळाला.
शासकीय यंत्रणांनी ताळमेळ राखून एकमेकांना प्रतिसाद दिल्यामुळे हे घडले आहे. महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने वीजबिल भरून सहकार्य केल्यामुळे महावितरणने त्यांचे आभार मानले आहेत.
