मोदीजींच्या वाढदिवशीच माँसाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होण्यामागे षडयंत्र
चौकशी करण्याची भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच माँसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना व्हावी हे संशयास्पद आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे देशभर लोकोपयोगी कार्यक्रम सुरू असतानाच या कार्यक्रमांच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी उबाठा गट, खा. संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक रचलेले हे कारस्थान आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विटंबना करणारा आरोपी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करून या घटनेमागचा ‘बोलविता धनी’ कोण याचा तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी श्री. बन यांनी राऊतांच्या ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या आरोपावर शरसंधान साधले. ते म्हणाले की, ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे जनतेच्या मतदानावर शंका घेणे आहे. मध्यप्रदेशातून मशिन येतात म्हणून संशय घेणे म्हणजे हास्यास्पद आहे. यावर, मग पाकिस्तानातून मतपेट्या आणायच्या का, असा खोचक सवाल श्री. बन यांनी केला. मतचोरीचे आरोप करून लोकशाहीवर शंका घेणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री. बन यांनी राऊतांना लक्ष्य करत म्हटले की, देवेंद्रजी हे चिकटवलेले मुख्यमंत्री नाहीत, तर उलट राऊतच जनतेने लटकवलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा नाही तर पक्का आहे. गेल्या 70 वर्षांत कुणालाही जमले नाही इतके अवाढव्य कार्य महाराष्ट्राच्या विकासासाठी देवाभाऊंनी केले आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने देवाभाऊंचे भविष्य उज्ज्वल आहे, तर राऊत आणि उबाठा गटाचे भविष्य मात्र अंधारात आहे, अशी सणसणीत टीका श्री. बन यांनी केली.
‘ब्रँड मोदी’ ‘ब्रँड देवाभाऊ’; बाकीच्यांचा बँड मुंबईकरांनी वाजवला
श्री. राऊत उठसूठ ब्रँडच्या गप्पा करतात. पण बेस्टच्या निवडणुकीत ‘ब्रँड’ कोण आणि ‘बँड’ कोणाचा वाजला याचे उत्तर मुंबईकरांनी दिले. भाजपा हाच महाराष्ट्राचा ब्रँड आहे, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस हेच विजयी ब्रँड आहेत. बाकीच्यांचा बँड जनता वेळोवेळी वाजवते असे म्हणत श्री. बन यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
अफजल खानाच्या पिलावळीला विरोध; अब्दुल कलामांसोबत भाजपा सदैव
अफजल खानाची पिलावळ खानाचे विचार सांगून राज्याला लुटण्याचं काम करतायत, त्यांना भाजपाचा सातत्याने विरोध असेल असे श्री. बन यांनी निक्षून सांगितले. राष्ट्रभक्त मुस्लिमांसोबत भाजपा सदैव खांद्याला खांदा लावून उभी आहे. अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनवलं, कारण ते राष्ट्रभक्त होते. खानाचा डीएनए घेऊन राजकारण करणाऱ्या राऊतांना जनता धडा शिकवेल, असा इशारा श्री. बन यांनी दिला.
बाळासाहेबांचा वारसा सोडून उबाठा गट आणि संजय राऊत काँग्रेसचा वारसा चालवत आहेत
बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी केले असेल तर ते उबाठा गटाने आणि श्री.राऊत यांनीच केले आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की “काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करीन”. पण आज उबाठा गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. हे बाळासाहेबांना कधीच रुचले नसते. त्यामुळे बाळासाहेबांचा वैचारिक वारसा संपवणाऱ्यांना त्यांच्या नावाने बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही, असा घणाघात त्यांनी केला.
