प्रति
मा. संपादक
सस्नेह नमस्कार !
कृपया सोबत दिलेली बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकाच्या राज्य, जिल्हा व ग्रामीण आवृत्तीतून प्रसिद्ध करावी ही विनंती!
स्पर्धा परीक्षांप्रमाणे तयारी केल्यास खेळांमध्ये उज्वल भविष्य
– शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ. सुनील मोरे
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
नाशिक (प्रतिनिधी) – कुठल्याही खेळातील प्रगतीसाठी समर्पण, शिस्त व मेहनत (डेडीकेशन, डीसिप्लीन आणि हार्डवर्क) आवश्यक आहे. खेळाकडे मनोरंजन किंवा टाईमपास म्हणून न बघता स्पर्धा परीक्षांप्रमाणे तयारी केल्यास त्यात नक्कीच उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ. सुनील मोरे यांनी येथे केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवशीय केंद्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या पटांगणावर विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा केंद्रीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे, म. वि. प्र. शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, विद्यापीठ विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. एस. आर. निकम, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ. मोरे म्हणाले की आता क्रमिक शिक्षणासोबत खेळातून देखील तेवढीच प्रगतीच साधता येते. त्यामुळे विविध खेळांचे महत्व वाढलेले आहे. खेळाच्या माध्यमातून तुम्ही पद, पैसा व प्रतिष्ठा प्राप्त करू शकतात. सध्याच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या काळात शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्य याचे महत्व वाढलेले आहे, जे खेळातून सहज प्राप्त होते. मैदानी असो वा बैठकीचे खेळ – दोन्हींचे आपापले महत्व आहे. खेळाडूंनी आपल्या आवडीच्या क्रीडाविषयासंबंधी छोटे – मोठे काही शिक्षणक्रम पूर्ण करावेत, क्रमिक शिक्षणासोबत अतिरिक्त कौशल्ये प्राप्त करावीत असे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की आयुष्यात यश कसे सांभाळावे व अपयश कसे पचवावे हे खेळातून शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा क्षेत्रातील प्रगतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इतर विद्यापीठांप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सव सारखे इतर अनेक उपक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन म्हणाले की खेळाच्या माध्यमातून खेळाडू हा शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिक दृष्ट्यादेखील मजबूत होतो. त्यामुळे जीवनातील कुठल्याही प्रसंगाचा सामना करून तो यशस्वी होतो, असे सांगितले.
तत्पूर्वी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. अली साबीर अस्लम (पुणे), उज्वल नारद (नागपूर), प्रणव साळुंखे (पुणे) व ऋतुजा बनकर (पुणे) या विद्यार्थी खेळाडूंनी क्रीडाज्योत कार्यक्रम स्थळी आणली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय क्रीडा महोत्सव ज्योत प्रज्वलित करून सदर केंद्रीय क्रीडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमास सुरुवात झाली. सायली भवड (पुणे) या विद्यार्थिनीने उपस्थित खेळाडूंना क्रीडाशपथ दिली. विद्यापीठाच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नांदेड या आठ विभागीय केंद्राच्या संघाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. नाशिक व पुणे या संघांमधील कबड्डीच्या सामन्याने या क्रीडा महोत्सवास प्रत्यक्ष सुरुवात झाली. सदर केंद्रीय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धीबळ, अँथलेटिक्स, बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. त्यात विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रातील एकूण ४०१ खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्यात ८३ विद्यार्थिनी खेळाडू व ३१८ विद्यार्थी खेळाडू यांचा समावेश आहे. यातून निवड झालेले विद्यार्थी हे येत्या दिनांक ०४ ते ०८ डिसेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी खर्जुल व डॉ. जागृती चव्हाण यांनी केले. क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. मंगेश पवार यांनी केले.
-महेंद्र बनसोडे
