प्रति, माननीय संपादकजी,
विषय:- बलात्कारी कुलदीप सेंगरला तुरुंगात नाही,तर फासावर लटकवायला हवे.
उन्नाव बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.कारण सेंगरच्या जामिन अर्जावर स्थगिती आल्याने सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पळवाटांवर अंकुश लागला आहे.परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की राजकीय पुढाऱ्यांच्या अशा घृणास्पद केसचा निकाल कासवाच्या गतीने का चालतो किंवा का लांबविल्या जातो हा मोठा गंभीर आणि गहन प्रश्न आहे.कारण सर्वसामान्यांच्या केसमध्ये सरकार व कायदा तडकाफडकी निर्णय घेतो आणि निर्णय लावतो ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.परंतु आपण ज्याला लोकप्रतिनिधी, आमदार म्हणतो असे माजी आमदार कुलदीप सेंगर यांच्या बलात्कार केस प्रकरणाला तब्बल आठ वर्षे पुर्ण झालीत म्हणजे तब्बल २९२० दिवस तरीही पीडितेला अजुन पर्यंत योग्य न्याय मिळालेला नाही ही दुर्भाग्यपुर्ण बाब आहे.उन्नाव बलात्कार प्रकरण जर फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चालविले असते तर आतापर्यंत सेंगर फासावर लटकला असता.सर्वांनाच कल्पना आहे की सेंगर दोषी आहे. परंतु सरकारने जर जातीने पुढाकार घेतला असता तर सेंगरला केंव्हाच फाशी झाली असती हेही तितकेच सत्य आहे..परंतु सरकार सुध्दा सेंगरला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.सरकारने हेही लक्षात ठेवले पाहिजे की,एका बलात्कारी सेंगरला जर ताबडतोब फाशी झाली तर देशातील राजकीय वर्तुळात भुकंप येईल व बलात्कार प्रकरणावर अंकुश लागेल हेही तितकेच सत्य आहे.राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की काही लोक सत्तेच्या पडद्याआड अनेक घृणास्पद कृत्य करीत असतात.तेच काम कुलदीप सेंगरने सत्तेमध्ये असतांना २०१७ मध्ये केले.परंतु आताही उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी यांच्यावर अजून पर्यंत कठोर शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. देशाती कोणतेही बलात्कार प्रकरण असो अशा केसेसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चालायला पाहिजे व यात ताबडतोब फाशीच्या शिक्षेचे प्रावधान असणे गरजेचे आहे.कारण कुलदीप सेंगर सारखे असे हजारो राजकीय पुढारी आहेत की आपल्या सत्तेचा,संपत्तीचा आणि अधिकाराचा गैरवापर करून घृणास्पद कृत्य करीत असतात. २०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणात मोठा निर्णय घेतांना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हायकोर्टाच्या त्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी दोषी आणि भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले कुलदीप सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्यात आली होती.अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम कुलदीप सेंगर याच्या केसचा ताबडतोब निर्णय लावून फाशीच्या शिक्षेचीच मागणी मुख्यत्वे करून सरकारकडून व इतर संपूर्ण राजकीय स्तरातून व्हायला पाहिजे.आता सरकारने वेळ न घालवता उन्नाव बलात्कार प्रकरणातील ठोस पुरावे पहाता पीडीतेला न्याय देण्याच्या उद्देशाने सामोर येण्याची गरज आहे जेणेकरून नराधम बलात्कारी कुलदीप सेंगर याला लवकरात लवकर फाशीची सजा होईल.कारण कुलदीप सेंगरच्या या घृणास्पद कृत्य पहाता सर्वच स्तरातून फाशीच्या शिक्षेची मागणी होत आहे.त्यामुळे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांना माझी नम्र विनंती आहे की उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावून नराधम सेंगरला फासावर लटकविला पाहिजे. तेव्हाच पीडीतेला योग्य न्याय मिळेल व लोकशाहीला नवी दिशा मिळेल.
–रमेश कृष्णराव लांजेवार
