केदारलिंग विकास सेवा सोसायटी वेतवडेच्या चेअरमनपदी रघुनाथ हरी पाटील तर व्हा.चेअरमनपदी भिकू कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड
इस्लामपूर/प्रतिनिधी/ पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ हरी पाटील तर व्हा. चेअरमनपदी भिकू कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धामणी खोऱ्यातील सर्वात जास्त सभासद संख्या व शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल असलेली सेवा संस्था म्हणून वेतवडे तालुका पन्हाळा येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेस ओळखले जाते.
३० एप्रिल १९५४ ची स्थापना असलेल्या या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या सेवा सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील तर व्हा. चेअरमन विष्णू रामजी पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप पाटील निबंधक कार्यालय पन्हाळा यांनी काम पाहिले.
नूतन चेअरमन रघुनाथ हरी पाटील व व्हा. चेअरमन भिकु कृष्णा पाटील यांचा माजी चेअरमन बाबू महादेव दळवी, विष्णू कृष्णा सुतार, जयसिंग पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व संचालक व गावातील जेष्ठ नागरिकांना फेटे बांधण्यात आले होते.
त्यानंतर ग्रामदैवत श्री जोतिबाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. चेअरमन रघुनाथ हरी पाटील हे श्री मोरजाई सहकारी दूध व्यवसायिक संस्थेचे संस्थापक चेअरमन असून या माध्यमातून गावच्या विकासात ते सक्रिय असतात तसेच गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.निवडीनंतर जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना गेल्या तीन वर्षात केदारलिंग सेवा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहून संस्था व शेतकरी हितासाठी काम करूया असे आवाहन केले.