Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादकोण जिंकणार महावितरणचा स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच?

कोण जिंकणार महावितरणचा स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच?

कोण जिंकणार महावितरणचा स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच?
महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेची उद्या सोडत

छत्रपती संभाजीनगर : सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. या योजनेची पहिली सोडत ऑनलाईन पद्धतीने सोमवारी (7 एप्रिल) रोजी काढण्यात येणार आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 32 उपविभागांसाठी एकूण 480 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीजबिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर 0.25 टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात 70 टक्क्यांहून अधिक वीजग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढवून ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड,  क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीजबिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक राहील.
लकी डिजिटल ग्राहक योजनेत प्रत्येक उपविभागासाठी प्रथम : एक स्मार्ट फोन, द्वितीय : दोन स्मार्ट फोन आणि तृतीय क्रमांकासाठी बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी 10 दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिस देण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 32 उपविभाग आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 8, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 15 व जालना मंडलात 9 उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागासाठी पाच बक्षिसे आणि एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल 480 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ग्राहकांना 1 जानेवारी ते 31 मे 2025 पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची 10 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments