किती उमेदवारांकडे आहेत विकासाचे नवे मुद्दे ?
धर्माबाद/ धर्माबाद नगर परिषदेअंतर्गत तब्बल 9 वर्षानंतर सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत.२०२१ मध्ये कोरोना काळात नगरपालिकेचा कार्यकाळ संपून आजतागायत म्हणजे चार वर्षे पालिकेवर प्रशासक राज होते. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर जनतेला आपले प्रतिनिधी निवडून देण्याची संधी आलेली असताना किती उमेदवार प्रबळ,सक्षम विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत हा चिंतनाचा विषय बनला आहे. प्रत्येक प्रभागात साधारण पाच-सहा उमेदवार निवडणूकिच्या रिंगणात उतरले आहेत. काही मोजके उमेदवार सोडले तर रस्ते,नाल्या,पाणी याशिवाय कुणाकडेही नवीन विकासाचे मुद्दे दिसत नाहीत. स्वातंत्र्याच्या सत्तर – पंच्याहत्तरी नंतर सुद्धा केवळ प्राथमिक सुविधांनाच अजूनही विकासकामे म्हणून संबोधणे म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे. याव्यतिरिक काही ठिकाणी स्मशानभूमीचा एक प्रलंबित मुद्दा अनेकांकडे विकासकामांच्या यादीत पडून आहे. मत मागायला येणाऱ्या किती उमेदवारांनी विकासकामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला हेच अजून कोणाला माहीत नाही.
रोजगाराअभावी अनेक मतदार आज मेट्रो सिटी, औद्योगिक वसाहत असलेल्या शहरात कामानिमित्त वास्तव्यास आहेत. आज त्याच मतदारांवर आपली लीड वाढवता येईल का याची चाचपणी उमेदवार करत आहेत. मात्र रोजगाराच्या संधी आपल्या परिसरात उपलब्ध करून घेण्यासंदर्भात प्रयत्न करण्यास कुणी तयार नाही. काही ठिकाणी तर मोठ्या पक्षांनी सुद्धा कमी शिकलेले उमेदवार दिले आहेत. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास त्यांचा काय हातभार लागेल हा विचार न केलेलाच बरा. प्रत्येक उमेदवार विरोधी पक्षांवर विकासाच्या बाबतीत आरोपांच्या फैरी झाडत आहेत मात्र रस्ते,नाली,पाणी याखेरीज मुद्देच बहुसंख्य उमेदवारांकडे नसल्याचे दिसते.