खुलताबाद नगरपरिषद निवडणूक
शिंदे सेना व भारतीय जनता पार्टीमध्ये लटकली
भाजपाने विश्वासघात केल्याचा शिंदे सेनेचा आरोप.
निवडणुकीत भाजपाला धडा शिकवण्याचा इशारा.
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व शिंदे सेनेमध्ये चांगलीच लटकली असून या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिंदे सेनेचा विश्वासघात केला असून त्यांना चांगला धडा शिकवणार असल्याचा इशारा शिंदे सेनेचे नेते माजी सभापती किशोर कुकलारे यांनी खुलताबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिंदे सेनेमध्ये युती असून या दोन्ही पक्षातील खदखद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. राज्य पातळीवर सुरू असलेला बेबनाव स्थानिक पातळीवर आला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.या यासंदर्भात बोलताना कुकलारे आणि म्हणाले की खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेला सन्मान जनक वागणूक दिलेली नाही. उलट प्रभाग क्रमांक दोन मधील शिंदे सेनेचे उमेदवार लिंगायत यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले त्याच प्रमाणे प्रभाग तीन मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीला उमेदवारी दिली.या सर्व बाबी शिंदे सेनेला खटकल्या असून निवडणुकीमध्ये विश्वासघातकी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला असून नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांच्या जागेवर शिंदे सेना विजयी होईल असा विश्वास कुकलारे यांनी यावेळी व्यक्त केला
यावेळी तालुका प्रमुख विशाल खोसरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब बारगळ युवराज नलावडे माजी नगरसेवक गीताराम काळे फकीरचंद काळे पोपट वेताळ, गटनेते नरेंद्र सिंग साळुंखे उमेश बारगळ.वीरेंद्र वाघ पांडुरंग काळे किरण मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
