खरेदीखता आधारे नामांतर होत नसल्याच्या निषेधार्थ महसूल दिनावर बहिष्कार टाकावा
ॲड. महेश धन्नावत यांचे जनतेला आवाहन
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यात विशेषतः मंठा तहसील कार्यालयात खरेदीखता आधारे (नोंदणीकृत दस्तऐवज) नामांतर न करता अधिकाऱ्यांकडून अनधिकृतरीत्या पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप ॲड महेश धन्नावत यांनी केला असून, याच पार्श्वभूमीवर येत्या महसुल दिनावर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या ॲड.धन्नावत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र लॅण्ड रेव्हेन्यू कोडच्या कलम 149 ते 154 अंतर्गत, नोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारे नामांतर करणे हे महसुल अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. मात्र, जालन्यात हे नियम पाळले जात नसून, नागरिकांना खरेदीखत दाखवूनही लाच द्यावी लागते. महत्त्वाचे म्हणजे लोकायुक्तांनीही जालना येथील महसुल अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्यपालांकडे कार्यवाहीसाठी शिफारस केली होती. तरीदेखील परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे ॲड. धन्नावत यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्हाधिकारी वयाने लहान व स्वभावाने नम्र असल्यामुळे महसुल अधिकारी त्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळेच भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, असा आरोप त्यांनी केला. इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्वतः यासंदर्भात लक्ष देत आहेत. परंतु, जालन्यात मात्र नागरिकांना अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व नागरिक, ज्यांचे खरेदीखता आधारे अद्याप नामांतर झालेले नाही, त्यांनी महसुल दिनावर बहिष्कार घालावा, असे आवाहन ॲड. महेश धन्नावत यांनी केले आहे.