वेरुळ लेणी परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज; मार्किंगचे काम सुरू होताच व्यवसायिकांमध्ये खळबळ
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद शहरातील हॉटेल शंजरी पासून कन्नडकडे जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत अतिक्रमण हटिवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, सोमवारी (ता.२१) सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दिलीप कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सागर सावजी,शाखा अभियंता एस.के चव्हाण यांनी मोजमाप व मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू केले.विशेष म्हणजे वेरुळ लेणी परिसरातील काही छोटे व्यापारी व टपरीधारकांनी परिस्थितीची जाणीव ठेवत स्वखुशीने आपली दुकाने हटवण्यास सुरुवात केली आहे.
या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून,मार्किंग पूर्ण होताच अतिक्रमण हटविण्यात येईल,असे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी सांगितले.त्यामुळे परिसरातील व्यावसायिक व दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “कधी अतिक्रमण हटवले जाईल?” या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान,दोन ते चार दिवसांत कारवाई होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून अंतिम तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धार्मिक,ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वेरुळ लेणी परिसराचा सुव्यवस्थित विकास होण्यासाठी अतिक्रमणमुक्ती ही गरजेची आहे,असे येथे येणाऱ्या पर्यटकांचे म्हणणे आहे.
दर शनिवार आणि रविवारी वेरुळ लेणी समोरील महावीर स्तंभ ते भोसले चौक या दरम्यान नेहमी वाहतूक कोंडी होते विशेषतः श्रावण मासात श्री घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन,त्यामुळे अतिक्रमणामुळे निर्माण होणारी वाहतूक अडथळे हे भाविक व पर्यटकांसाठी त्रासदायक ठरते.
प्रशासनाने हाती घेतलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही काळाची गरज असून,धार्मिक,पर्यटन स्थळाचा दर्जा टिकवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे पर्यटक आणि नागरिकांनी सांगितले.
