शिक्षण म्हणजे काय रे भाऊ?

0
23
शिक्षण म्हणजे काय रे भाऊ?
देशातील लोकांना अजूनही शिक्षणाचा अर्थ, गांभीर्य आणि उद्देश कळालाच नाही. आजही कोणाला विचारले शिक्षण म्हणजे काय तर तो व्यक्ती बिए,.बिएससी, एम ए,एम एस सी असेच सांगेल. आणि सुशिक्षित म्हणजे कोण तर वरील सांगितल्या प्रमाणे शिक्षण घेणारा व्यक्ती म्हणजे सुशिक्षित असेच उत्तर येणार. हा लेख लिहण्या मागचा उद्देश हा आहे कि एका शिक्षकाने स्वतःच्या मुलीला कमी गुण मिळाले म्हणून मारले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. सदर घटना ही मनाला चटका देणारी आहेच. घटना घडल्यावर अनेक लोक स्वतः चे मत मांडून घडलेल्या घटनेचा निषेध करून पालकांनी कसे रहावे याचे सल्ले देत आहेत. शिक्षक पित्याने मुलीची हत्या केल्याने जास्तच प्रकरण तापले गेले. शिक्षकाने जे केले ते चुकिचे आहेच परंतु बाकीचे स्वतःला सुशिक्षित समजणारे लोक बरोबर आहेत का हा प्रश्न ऐरणीवर आहे. शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचा उद्देश काय हे अजूनही आपल्याला समजले नाही. आपण थोडक्यात बघितले तर देशात पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी सुरू करून महिलांच्या जिवनात क्रांती केली मानसिक, बौद्धिक व शारीरिक गुलामगिरी, अंधविश्वास व विषमतेच्या बेड्या तोडून विज्ञानवादाच्या मार्गाने जाऊन स्वतः मध्ये वैचारिक परिवर्तन होण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या शिक्षणाला कुटील व बुद्धीहीन लोकांनी विरोध केला. तरीही अंगावर शेणमाती घेऊन शिक्षणाची कास सोडली नाही. म्हणून चोथ्या वर्गातील मुक्ता प्रश्न विचारते आमचा धर्म कोणता? आज महिलांच्या कपाटात साड्या आणि साड्यावर परफ्यूम चा वास येण्यासाठी सावित्रीमाई यांनी शेण, माती आणि खरकटे पाणी अंगवर सहन केले म्हणजे काय असेल शिक्षण? छत्रपती शाहु महाराजांनी स्वतःच्या राज्यात बोर्डींग सुरू करून एक एक आण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या काळात मुलांना शाळेत पाठवले नाही तर पालकांना एक रूपया दंड आकारणारे शाहु महाराज शिक्षणाला एवढे महत्त्व का देत होते? शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हटले असेल? गाडगेबाबा म्हणतात भाकरी हातावर घेऊन खा पण मुलांना शाळेत पाठवा असे समाजाला वारंवार का सांगत असतील? त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून काय साध्य करायचे असेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाची द्वार खुले करून आपल्याला शिक्षीत करण्यासाठी फुले शाहु आंबेडकर यांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महामानवाचे फोटो शिक्षीत लोकांच्या घरात आहेत का? जर हे महापुरुषांचे फोटो घरात लाऊ शकत नाहीत तर यांना शिक्षीत कसे म्हणावे? जो अन्याया विरोधात गुरगुरत नाही ते शिक्षण आहे का? आज डोक्यात मेंदू नसलेल्या लोकांनी शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवून पैसे कमवण्याचे माध्यम समजले आहे. परंतु शिक्षण म्हणजे केवळ आर्थिक विकास मुळीच नाही. शिक्षण म्हणजे बौद्धीक व वैचारिक परिवर्तन म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे जास्त मार्क्स घेऊन परिक्षा पास होणे मुळीच नाही. शिक्षण म्हणजे फक्त पैसा मिळण्यासाठी नोकरीच्या मागे धावने मुळीच नाही. शिक्षण माणसाला वैचारिक परिपक्व आणि मानसिक समृद्ध करून मानसामध्ये नैतिकता व प्रामाणिकपणा भरते. शिक्षण माणसाला मानसिक गुलामीतुन मुक्त करते, शिक्षण माणसाला समता व सामाजिक न्याय शिकवते, शिक्षण माणसाला सर्वांसोबत माणसा सारखी वागणूक द्यायला शिकवते, शिक्षण माणसाला स्वतः चा सामाजिक विकास व आपल्या सोबत समाजाचा सामाजिक विकास करायला शिकवते. वरिल बाबी ज्यांच्या अंगी आहेत तो सुशिक्षित आणि त्याने जे आत्मसात केले ते शिक्षण होय. आज आपण शाळा महाविद्यालयात जाऊन वाचलेल्या पुस्तकाला शिक्षण समजतो. आणि शाळा महाविद्यालयात जे पुस्तके वाचली जातात ती बहुतांशी फक्त  मार्क्स मिळावे यासाठीच असतात. त्याचे गांभीर्य, आशय व कारण लोकांना कळतच नाही.  एक दोन उदाहरणाद्वारे समजून घेतले तर लक्षात येईल. पहिले उदाहरण विज्ञानाचे घेऊ कोणत्याही घडणाऱ्या घटनेला काही ना काही आधार नक्कीच असतो. कोणतीही गोष्ट विना आधार घडत नाही. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीमागे कारण असते. आपण आग पेटवली तर ऑक्सिजन मिळतो म्हणून आग जळते, जळणासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. हे उदाहरण जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला लागु होते, वेगवेगळे सरायने एकत्र आले तर तिसरीच काहीतरी तयार होते. थोडक्यात प्रत्येक गोष्टीच्या निर्मिती मागे कोणाचा ना कोणाचा आधार आहे हे माहित असताना, विज्ञान  प्रत्येकाने शिकलेले असतात आजही लोक चमत्कार, पाखंड यावर जर विश्वास ठेवत असतील तर त्याला शिक्षण म्हणायचे का? दुसरे एक उदाहरण घेऊया राज्य घटनेचे. राज्यशास्त्र किंवा स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना राज्यघटना प्रत्येक जण वाचतो. मार्क्स मिळविण्यासाठी त्याचा वापर करतात. राज्य घटनेने मुलभूत अधिकार बहाल केले, राज्यघटनेने देश चालतो, राज्य घटने मुळे आपण अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उठवतो, राज्य घटनेने प्रत्येकाला समान हक्क, स्थान व संधी उपलब्ध करून दिली वगैरे वगैरे सगळं काही वाचतो. स्पर्धा परिक्षा पास होऊन समाजाची सेवा करायची अशी बोलणारे लोक घरात राज्य घटना आणि घटनाकारांचा फोटो लावत नसतील तर त्यांना शिक्षीत म्हणायचे का? शिक्षण हे स्वतः सह समाजाचा उद्धार करणारे माध्यम आहे. आपण आज जर बघितले तर शिक्षणातून तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, तहशिल कार्यालयातील कर्मचारी, व इतरही कार्यालयातील कर्मचारी यांचा विचार केला तर हे महाविद्यालयात पुस्तक वाचुन नोकरीवर लागलेली लोक आहेत. जे नोकरी वर लागली ते स्वतःला जरा जास्तच बुद्धिमान समजतात. अर्थात सगळेच असे असतात असे नाही पण बहुतांश लोक असेच असतात. गरिबीत शिकुन मी नोकरी ला लागलो म्हणणारे लोक मग तो तलाठी असेल तर शेतकऱ्यां कडून कसे आणि कोणकोणत्या कामाचे किती पैसे घेतो हे शेतकऱ्यांना माहिती आहे. माहीतीच नाही तलाठ्या कडून काम करून घ्यायचे म्हणजे पैसे द्यावेच लागतात असा अलिखित पण सर्वमान्य नियमच आहे. ग्रामसेवक असेल तर घरकुल मिळण्यासाठी बेघर गरिब लोकांकडून किती पैसे घेतात आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचे घरकुल कसे डावलले जाते आणि ज्यांनी पैसे दिले, जो ग्रामसेवक यांच्या जवळचा आहे त्या व्यक्तीला पक्के घर असताना पुन्हा घरकुल मिळते हे सर्वांना माहिती आहे. पोलिस असतील तर दारू, मटका, प्रवासी वाहने, यांच्या कडून स्वतःच्या खिशात दररोज किती पैसे भरत असतील याची गणती आहे का? एखादे भांडण झाले, चोरी झाली किंवा इतर गुन्हेगारी प्रवृतीची तडजोड करायला किती खर्च येतो लोकांना माहिती आहे. तहशिल मध्ये राशन कार्ड असेल, कोतवाल नक्कल असेल, एवढेच काय निराधार, विधवा, विकलांग लोकांच्या योजना असो या ठिकाणी सुद्धा निराधार, विधवा, विकलांग लोकांकडून ही पैशाची मागणी केली जाते थोडक्यात प्रत्येक कार्यालयात गोरगरिबांचे कामे विनापैसे होत नसतील आणि सरकारी पगार घेऊनही गोरगरीब लोकांकडून ज्यांची खायची सोय नाही, राहायची सोय नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन स्वतः ची घरे भरणाऱ्या बेईमान लोकांना सुशिक्षित म्हणायचे का? सर्वच सरकारी कर्मचारी भ्रष्ट आहेत असे मुळीच नाही पण आजपर्यंत अनेक उदाहरणे समोर आलेले आहेत तलाठी, पोलीस, ग्रामसेवक व इतरही कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे करोडो रुपये सापडले. जे पकडले गेले ते फक्त उदाहरण आहेत. असे कितीतरी कर्मचारी दररोज बाहेर गोरगरिबांचे खिसे रिकामे करत आहेत त्यांना शिक्षीत म्हणायचे? जर कर्मचारी लोकांकडे करोडो रुपये सापडू शकतात तर अधिकारी वर्गांकडे किती चे गबाड असेल? आणि संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे किती पैसा प्रामाणिक कमाईमधील असेल याचा विचार न केलेलाच बरा. पण अशा लोकांना शिक्षीत म्हणायचे का? शाळेतील पुस्तके वाचणारे अनेक लोक अनेक चुकिच्या प्रकरणात गुन्हेगारी क्षेत्रात समोर आहेत त्यांना शिक्षीत म्हणायचे का? बलात्कार, अपहरण हे शिकलेल्या लोकांमध्ये जास्त घडून येते त्यांना शिक्षीत म्हणायचे का? शिक्षक, डॉक्टर, पोलीस, शासकीय, खाजगी कार्यालयात महिला सुरक्षित नाही मग त्यांना सुशिक्षित म्हणायचे का? नाही रे भाऊ ते शिक्षण नाही. स्वतःच्या ताटातील खास गरजुंना देणे, गोरगरिबांना मदत करणे, स्रियांचा सन्मान करणे, देश व देशाचे प्रतिकांचा सन्मान करणे, मेहनतीने पैसे कमावून गरजुंना मोठ्या मनाने मदत करणे, आणि सर्वात महत्वाचे नोकरी कोणतीही असो, पैसा कोणत्याही मार्गाने कमवावी पण ते करतात इमानदारी व नैतिकता हरवली जाणार नाही म्हणजे शिक्षण रे भाऊ…
-विनोद पंजाबराव सदावर्ते