Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादकर्करोगाच्या बाबतीत केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष...

कर्करोगाच्या बाबतीत केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष देणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्करोगाच्या बाबतीत केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष देणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ या जागतिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी एनसीआयचे अध्यक्ष अॅड. सुनील मनोहर, एनसीआयचे महासचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, तसेच एनसीआयचे ग्लोबल ऑपरेशन्स अँड स्ट्रॅटेजी डायरेक्टर शशी मंदापती यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणताही आजार किंवा विकार सीमा ओळखत नाही, तो व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थिती पाहत नाही. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे आणि सीमांच्या पलीकडे जाऊन उपाय शोधणे ही आपली जबाबदारी आहे. ही परिषद केवळ चर्चेसाठी मर्यादित नसून, व्यापक दृष्टीकोनातून विचार करण्याचे व्यासपीठ असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारखी संस्था उभी राहिल्याने केवळ भारतातीलच नव्हे, तर विविध देशांमधील रुग्णांनाही उपचाराची सुविधा मिळत आहे. अशा अधिकाधिक संस्थांची देशाला गरज आहे. या अनुषंगाने आपल्या राज्यात ‘महा कॅन्सर फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली असून या संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात ‘हब मॉडेल’च्या आधारे कॅन्सर ग्रिड उभारली जात आहे, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्करोग उपचाराच्या क्षेत्रात अधिक संशोधन, नवोन्मेष, मेडटेक, बायोटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा व्यापक वापर आवश्यक आहे. विशेषतः वेळेत निदान आणि प्रारंभिक टप्प्यातच कर्करोगावर प्रभावीपणे मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

कार्यक्रमादरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि गयाना या देशातील आरोग्य विभागादरम्यान कर्करोग उपचारपद्धती या संदर्भातील एमओयु करण्यात आला. तसेच ‘द विंग्स’ या वैज्ञानिक वृत्तपत्रिकेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments