प्रति, माननीय संपादकजी,
विषय:-शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद;म्हणणाऱ्या सहकारमंत्री यांच्या मुसक्या राज्यपालांनी आवराव्या!
महाराष्ट्राचे राजकारण आज कुठे पोहचले आहे!याची लाज वाटावी अशी परिस्थिती झाली आहे.एरवी या भुमित आपल्याला सौजन्यशिल, मृदू, प्रगल्भ भाषेसाठी राज्याची देशात चांगलीच ओळख होती.परंतु सन्मानजनक भाषेच्या बाबतीत ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज राजकारण्यांनी गलीच्छ केल्याचे स्पष्ट दिसून येते आणि त्याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर आहे.राज्याला असे कदापि वाटत नव्हते की,सहकारमंत्री बाबासाहेब पाटील एवढे निर्लज्जतेचा कळस गाठतील.परंतु आजकाल राजकीय पुढाऱ्यांच्या जिभेला हाडच रहालेले नाही ही बाब पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.आपण काय बोलतो आणि कोणाबद्दल बोलतो याबद्दल थोडीशी जणांची नाहीतर मनाची लाज वाटायला पाहिजे! मंत्रीमहोदय म्हणतात निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही काहीही आश्वासन देतो. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे,असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथील चोपडा येथे केले.शेतकरी वारंवार कर्ज माफी का मागतात याचा विचार पाटील यांनी कधी केला का? शेतकऱ्यांना शेती करतांना किती यातना व दु:ख सोसावे लागतात याची जाण पाटलांना आहे का?ऊन, पाऊस, थंडी, वादळ,सुका दुष्काळ,ओला दुष्काळ,परिवाराच्या वेदना अशाप्रकारे राज्यातीलच नाही तर देशातील संपूर्ण शेतकरी या संपूर्ण घडामोडी मधुन आपल्या शेतात अन्नधान्यांचे उत्पादन काढत असतो.तेव्हा देशाच्या १४० कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरत असते.परंतु सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करून राज्याच्याच नाही तर देशातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले व अपमान केला आहे.आज अती पाऊसामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण इत्यादीसह राज्यातील अनेक भागातील शेतकरी अत्यंत दु:खी व चिंतेत आहे.कारण त्यांची पिके तर गेलीच सोबत शेतातील माती सुध्दा वाहुन गेली व काही भागात जिवितहानी सुध्दा झाली.अशी भयावह परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.राज्यात अतिवृष्टीमुळे ३६ पैकी ३१ जिल्हे अत्यंत प्रभावीत आहेत.त्याचप्रमाणे आजही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यां अजुनपर्यंत थांबलेल्या नाहीत.हृया गोष्टींचा अभ्यास करण्यापेक्षा मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात हे कसले लोकप्रतिनिधी व कसले मंत्री अशांना तर शेतकऱ्यांनी गाव बंदी करायला पाहिजे.शेतकरी हा अन्नदाता असुन देशाचा आधारस्तंभ आहे.त्यामुळे त्यांची सर्वतोपरी मदत होणे गरजेचे आहे.राज्यासह देशातील राजकीय पुढारी पाच वर्षांत करोडपती होतो व मोठ्या प्रमाणात चलअचल संपत्ती गोळा करतो.परंतु शेतकऱ्यांचे तसे नसते आज शेतकरी मानाने, विचाराने व जमिनीने करोडपती असुन सुद्धा पैशांनी शुन्य आहे याची जाण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लक्षात ठेवली पाहिजे. चुकीचे वक्तव्य करून उचल्ली जिभ लावली टाळ्याला हा प्रकार राजकीय पुढाऱ्यांनी ताबडतोब बंद केला पाहिजे. कर्जमाफी ही बाबासाहेब पाटील यांच्या खिशातून होते का? किंवा यांच्या पगारातून होते.यांना तर असे वाटते की शेतकऱ्यांची कर्ज माफी म्हणजे आपले दिवाळे निघते की काय! त्यामुळे मंत्री बाबासाहेब पाटील थोडी शरम करा आणि असे घृणास्पद वक्तव्य करण्यापासून स्वतःची जिभ आवरा. आपण मंत्री आहात म्हणून काहीही बोललेले शेतकरी खपवुन घेणार नाही.राजकीय पुढारी व मंत्री पाटील यांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपण एसीमध्ये बसता, लाखांच्या गाडीत फिरता, करोडोंच्या घरात रहाता,हवाई सफर करता,आलेशान खुर्चीवर बसता.परंतु शेतकरी हा मातीत राबतो,जमीनीवर रहातो, ऊन, पाऊस,थंडीची झळा सहन करतो तेव्हा त्याची शेती होते व शेतीतून उत्पन्न काढतो त्याला म्हणतात हाडामासाचा शेतकरी. फक्त खुर्चीवर बसल्याने,लोकप्रतिनिधी झाल्याने व खोटी समाजसेवा केल्याने कोणी समाजसेवक होत नाही, यासाठी मेहनत करावी लागते.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्यावरून असे वाटते की यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही फक्त मत लुबाडण्यासाठी शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देवून दिशाभूल करून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम पाटील करीत आहे.त्यामुळे अन्नदाता शेतकरी यांची बेजबाबदार वक्तव्यातून पाटील यांनी केलेली विटंबना अत्यंत शर्मनाक व घृणास्पद असल्याने त्यांना कोणत्याही संविधानीक पदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही असे मला वाटते.कारण मंत्री महोदयांनी लक्षात ठेवले पाहिजे की शेतकरी जगला तरच आपल्याला अन्न पुरवठा होईल.आज ग्लोबल वॉर्मिगमुळे, युद्धजन्य परिस्थिती व बदलत्या हवामानामुळे राज्यातीलच नाही तर संपूर्ण जगातील शेतकरी अत्यंत दु:खी व चिंतेत आहे.त्यामुळे त्यांच्यापुढे नेहमीच जिवन मरणाचा प्रश्न उपस्थित होतो. राज्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठ्या वाढल्याचे दिसून येते.फक्त मंत्री बनुन तोंडानी बोलने सोपी आहे पाटील साहेब शेताच्या धुऱ्यावर जाऊन पहा, चिखलात पाय रूजवुन पहा,एखाद्या शेतकऱ्यांच्या घराला भेट देऊन पहा त्यांच्या व्यथा पाहून सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तुमच्या सारखे निर्लज्ज मंत्री तोंडांत आले तसे ओकतात ही महाराष्ट्रा सारख्या सुसंस्कृत व संतभुमिला शोभा देत नाही. आपण राज्याला कलंकित करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या निर्लज्ज मंत्र्यांच्या बाबतीत मी हेच म्हणेल की,आपण हाडामासाचे शेतकरी आहोत.त्यामुळे अशा मंत्र्यांना राज्यातील कोणत्याही गावात पाय ठेवण्याचा अधिकार नाही असे मला वाटते.यापुर्वी असेच वादग्रस्त वक्तव्य माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते तरीही ते आजही मंत्री आहेत याला काय म्हणावे समजत नाही!अशांना तर संपूर्ण संविधानीक पदावरून पायउतार करायला पाहिजे.आज महागाईने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जाचा सहारा घ्यावा लागतो.बदलत्या हवामानामुळे निसर्ग शेतकऱ्यांना पुर्णपणे साथ देत नाही अशा परिस्थितीत कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत जाते व शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते.सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना जाहीर करतात व राबवितात हा पैसा जनतेचा असतो मंत्र्यांच्या घरचा किंवा त्यांच्या खिशातील नसतो.त्यामुळे आज शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत सापडला आहे त्यामुळे त्यांचे कर्ज माफ जर केले तर सरकारचे किंवा मंत्र्यांच्या खिशाला कोणती कात्री लागणार आहे?शेतकऱ्यांना जर कर्ज माफ झाले तर राज्याच्या जनतेमधून पैसा जाईल व याचे स्वागत राज्याची जनता सुध्दा करेल.त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य देणे बंद करून ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या मुसक्या राज्यपालांनी व सरकारने आवराव्या.जय जवान जय किसान, जय हिंद.
–रमेश कृष्णराव लांजेवार
