कडेठाण मध्ये मोबाईल टॉवर ठेवलाय नावाला, अन रेंजच मिळेना गावाला
हा क्रमांक बंद असल्याचे किंवा उपलब्ध नसल्याचे मिळते उत्तर
आत्ताच एक्सप्रेस
पैठण /प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील कडेठाण येथील जिओ व एरटेल चे नेटवर्क टॉवर म्हणजे असून खोळंबा झाले आहे. कडेठाण,गेवराई मर्दा,कडेठाण तांडा, कडेठाण खुर्द, सुलतानपूर येथील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. गावात मोबाईल टॉवर असला तरी रेंज मात्र नाही, अशी स्थिती एक महिन्यापासून कायमच आहे. अचानक नेटवर्क गायब असल्याने मोबाईलधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे. अपवाद वगळता सर्वाकडे मोबाईल आहे. सोईनुसार विविध कंपन्यांची सीमकार्ड मोबाईलधारक वापरतात. मात्र,पैठण तालुक्यातील कडेठाण गावामध्ये एरटेल व जिओ दोन नेटवर्क टॉवर असून दोन्हीला पण महिनाभरा पासून रेंज नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक मोबाईलधारक त्या त्या कंपनीच्या नेटवर्कसंदर्भात तक्रार करत आहेत.
काहींनी वर्षभराचे तर काही महिनाभराचे रिचार्ज मारत असल्याने त्यांचा उपभोग मात्र घेता येत नसल्याची परिस्थिती आहे. बँकिंग तसेच पीक विमा भरण्यासाठी, ई पीक पाहणी करतांना, शेतीविषयक महाडिबीटी ऑनलाईन, आधार संलग्न सिम कार्डवर येणारा ओटीपी द्यावा लागतो. परंतू मोबाईल सेवा विस्कळीत होत असल्याने त्यात अडचणी येत आहेत.
कोणाशी संपर्क करणेही मुश्किल झाले आहे. हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे उत्तर समोरच्याला मिळत असल्याने अनेकांचा संभ्रम होत आहे. नेटवर्क मिळाले तरी त्याला स्पीड नसते. त्यामुळे जगाची सफर करणारे गुगल चालत नाही. परिणामी अनेकांनी पर्यायी सीम घेतले, मात्र त्या कंपनीच्या नेटवर्कलाही रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नेटवर्क नसल्याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकाना बसत आहे. या परिसरात सेवा देणार्या मोबाईल कंपन्यांनी सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.