जोरदार पावसाने जालन्यातील गांधीनगरला आले तलावाचे स्वरूप
तात्काळ ऊपाययोजना न केल्यास घाण पाणी मनपाच्या दालनात टाकण्याचा अमजद खान यांचा ईशारा…
जालना/प्रतिनीधी / दिनांक 05 सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान जालन्यात जोरदार पाऊस झाला. शहरात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे जालना शहरातील गांधीनगर येथे मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आले.यामुळे पहिल्याच पावसात मानपाची पोलखोल झाल्याचे सामाजिककार्यकर्ते अमजद खान यांनी म्हटले. मागील दीड महिन्यापासून खोदून ठेवलेल्या या मुख्य रस्त्याचे काम बंद असल्याने नागरिकांना याचा अत्यंत त्रास होत आहे. परंतु महानगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांना मात्र याचे काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे काम करण्यासाठी अतिक्रमणाच्या नावाखाली नागरिकांचे घरे तोडण्याची पालिकेने तत्परता दाखवली. परंतु दोन वेळेस उद्घाटन होऊनही दीड ते दोन महिन्यापासून या रस्त्याचे काम अजूनही ठप्प असल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच आज वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने या मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. आता या मार्गावरील नागरिकांनी कसे ये-जा करावे असा प्रश्न स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमजद खान यांनी बोलून दाखवला.