सामाजिक जीवन सर्वसमावेशक करूया
सापासमान येथे टाकून कात आहे
तुझ्या-माझ्यात अजुन ही जिवंत जात आहे
झाली किती भयानक धर्मांधता अघोरी
ती माणसात घुसूनी माणूस खात आहे
जातीय, धार्मिक कट्टरतेमुळे समृद्ध, सुखमय आणि आनंददायी सामाजिक जीवन धोक्यात आले आहे. ही येणाऱ्या भविष्यकाळासाठी धोक्याची घंटा आहे. ही कट्टरता मनात ठेवून पुढची पिढी वाढत आहे. कळत-नकळत आजची निरागस बालके, निष्पाप लेकरे सध्या परपस्पर जाती-धर्मांबदलच्या द्वेषाचे विष डोक्यात साठवत असल्याने मोकळ्या मनाने, सर्वसमावेशक विचाराने आणि सामंजस्याने एकत्र राहताना, मैत्रीभाव जपताना दिसतील का…? यावर चिंतन होणे आवश्यक आहे. परंतु यावर कोणीही गांभीर्याने विचार करण्यासाठी तयार नाही. प्रत्येकजण आपल्या खोट्या सांप्रदायिक, पंथीय, जातीय आणि धार्मिक दुराभिमानामध्ये अडकून पडला आहे. दिवसेंदिवस या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम सामाजिक जीवनावर दिसत आहेत. आजच्या क्षणाला माणूस म्हणून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जात, पात, पंथ, धर्म, वंश यापेक्षा देश मोठा असतो. ही भावना जनमानसामध्ये रुजणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. माझी जात, माझा धर्म हा माझ्या घरापुरता मर्यादित आहे. सामाजिक जीवन जगत असताना मी फक्त या भारताचा सुजाण नागरिक आहे याची जाणीव प्रत्येक व्यक्तीने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या संप्रदाय, जात, धर्म, वंश यांच्या बद्दल वाटणारा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, अभिमान सहाजिक आहे. तो मर्यादित प्रमाणात प्रत्येकाला असावा. परंतु दुसऱ्या जात, धर्म, संप्रदाय यांच्या विषयी द्वेष, तिरस्कार, कटुता बाळगण्याचा कुणालाही कोणताही अधिकार नाही. आपल्या जातीच्या, धर्माच्या समृद्ध परंपरा…. आपल्या जाती-धर्माचा दैदिप्यमान इतिहास यामधून प्रत्येक व्यक्तीने आदर्श घेऊन चांगल्या प्रकारचे सामाजिक जीवन जगणे अपेक्षित असते. जगाच्या पाठीवर जेवढे धर्म व जेवढ्या जाती अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक धर्माची, जातीची शिकवण ही मानवता हाच खरा धर्म आहे, आणि माणुसकीने जगणे हे आपले माणूसपण आहे. हे सांगत असते.
“मानवता हाच खरा धर्म आहे.” अशी जगाला शिकवण देणाऱ्या आमच्या देशात आजच्या काळात मानवता आणि माणुसकी हरवली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. आज माणुसकी आणि मानवता याचा अर्थ लोकांना सांगावा लागत आहे. माणसाने जनावराप्रमाणे वागू नये… तर माणसाने माणसासारखे वागणे म्हणजेच माणुसकी. आणि हे माणूसपण जपणारी बाब म्हणजे मानवता धर्म….. मला माझ्या गझलेच्या काही ओळी आठवतात.
रामात तोच आहे, आल्लात तोच आहे
वाटू नका कुणीही धर्मात ईश्वराला ….
धर्मामध्ये कशाला वाटून हात घेता
कोंडू नका कुणीही जातीत ईश्वराला ….
खरे पाहता माणूस म्हणून आपण सर्वजण एक आहोत, सारखे आहोत. ह्याच मनुष्यत्वाचा विचार करून आपण एकरूपतेने व एकसंघतेने राहणे गरजेचे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘हे विश्वचि माझे घर’….. याप्रमाणे प्रत्येक मानवी जीव हा माझा कुटुंबातील सदस्य आहे. ही भावना मनात रुजली पाहिजे. किमान या देशाचा…. या राज्याचा नागरिक हा माझा बांधव आहे. हा विचार थोर महापुरुषांनी आपल्याला दिलाय…. तो विचार आपण सर्वांनी जपला पाहिजे…. आणि भविष्याच्या पिढीला दिला पाहिजे. ज्याप्रमाणे कुटुंबात एकी असेपर्यंत ते कुटुंब सुखात असते… आनंदात असते…. समृद्ध असते…. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य म्हणून… मानव म्हणून… माणूस म्हणून आपण जोपर्यंत एक राहू तोपर्यंतच आपल्याला आनंद मिळणार आहे. कुटुंबात मतभेद झाले. मतभेदाचे रुपांतर मनभेदात होऊन नंतर कुटुंब वेगळे झाले की, पुढे जी कटूता भावा-भावात निर्माण होते…. ती कधीच कमी होत नाही…. ती दिवसेंदिवस वाढत जाते…..तशाच पद्धतीने समाज हे कुटुंब आहे आणि या कुटुंबात मतभेदाचे रुपांतर मनभेदात झाले की, समाजाचे छोटे-छोटे तुकडे होतात… आणि मग एकसंघ समाजाची विदारक अवस्था होते. विभक्त झालेल्या समाजामध्ये एकसंघ समाज व्यवस्थेमधला आनंद संपून जातो. समाजाची एकसंधता टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक सर्वसमावेशकता आणि सामाजिक ऐक्य जपावे लागेल.
खरे पाहता सर्वसामान्य माणसे ही गुण्या-गोविंदाने, आनंदाने एकमेकांना सहकार्य करत सामाजिक जीवनात एकत्रितपणे जगत आहेत. आपले दैनंदिन व्यवहार सांभाळत असताना कोणताही सर्वसामान्य माणूस जातीचा, धर्माचा, वंशाचा विचार करून आपले जीवन जगत नाही. आपल्या सर्वांचे जीवन एकमेकांशी निगडित आहे. एकमेकांवर अवलंबून आहे. एकमेकांच्या सहकार्याने ते आनंदी होत आहे. प्रत्येक समाज घटकाचे सामाजिक जीवनामध्ये अमूल्य असे योगदान आहे. प्रत्येक समाज घटकाच्या सहभागामुळे सामाजिक जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झालेले आहे. याची जाणीव प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आहे. म्हणूनच विश्वासाने एकमेकांचा हात हातात घेऊन सामाजिक जीवनात अनेक वैविध्य असणारी माणसे एकत्र येऊन सुखा-समाधानाने जीवन जगताना पाहायला मिळतात.
आजच्या ही सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्य माणसे माणूस म्हणून एकमेकाशी चांगलेच वागतात. विनाकारण कोणत्याही गोष्टीमुळे एकमेकांचे एकमेकांशी वादविवाद किंवा भांडण नाही. आजही समाजात वेगवेगळ्या घटकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पाहायला मिळते. आजही लोक एकमेकांचे जिवाभावाचे मित्र आहेत. स्वतःच्या प्राणापेक्षा दुसऱ्यावर प्रेम करणारी माणसे आहेत. दुसऱ्याच्या सुखाची, दुसऱ्याच्या हिताची विचार करण्याची परंपरा आजही आबादित आहे.
फक्त काही बोटावर मोजण्या एवढी समाजकंटक माणसे आहेत जी माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करतात. स्वतःच्या हितासाठी…. स्वतःच्या स्वार्थासाठी… किंवा आपल्या अज्ञानामुळे, गैरसमजुतीमुळे जातीमध्ये, धर्मामध्ये, वंशामध्ये, पंथांमध्ये माणसांची विभागणी करतात. एक मनाने नेक मनाने राहणाऱ्या समाजाला आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या गटात विभागून टाकतात. एकमेकांमध्ये द्वेष, तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. छोट्या-छोट्या मतभेदांचा वापर करून माणसा-माणसांमध्ये मनभेद घडवून आणतात. एकमेकांशी सहकार्य करत संपन्न जीवन जगत आसलेल्या समाजाला एकमेकांचा विरोधक… एकमेकांचा शत्रू बनवतात. एक समाज घटक …. दुसऱ्या समाज घटकासाठी कसा घातक आहे…? तो त्याचा कसा शत्रू आहे …? हे वारंवार बिंबवण्याचा प्रयत्न करतात.
खरे पाहता संविधानाच्या, नियमाच्या, कायद्याच्या या देशात या राज्यात कोणताही समाज घटक कोणत्याही समाज घटकासाठी घातक नाही. प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आहे. न्यायासाठी आपल्या अधिकारासाठी सर्वांना समान नियम आहेत. आपल्या समाजाच्या न्याय मागण्याची मागणी करण्यासाठी विहित कार्यपद्धती आहे. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी विविध मार्ग अस्तित्वात आहेत. आजच्या या जागृत काळात जागरूक असणाऱ्या कोणावरही अन्याय होऊ शकणार नाही. आणि कोणावरही अन्याय होऊ नये… अशा प्रकारची यंत्रणा… अशा प्रकारचे प्रशासन… संविधानाद्वारे, कायद्याद्वारे आपल्या देशात, राज्यात प्रस्थापित झाले आहे. यामुळेच कायद्याच्या, न्यायाच्या दृष्टीने या देशात सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती एक समान आहेत.
एखाद्या व्यक्तीची चूक….. एखाद्या व्यक्तीचे कट-कारस्थान…. निषेधार्ह वाईट प्रवृत्ती त्या संपूर्ण समाज घटकाशी जोडणे…. सातत्याने एखाद्या समाज घटकांवर टीका-टिप्पणी करणे… दोषारोप करणे…. हेतुपूर्वक एखाद्या समाज घटकाला बदनाम करणे… हे किती दिवस चालत राहणार….? यातून आपण काय साध्य करू पाहत आहोत…? हा द्वेष, तिरस्कार, कटुता निर्माण करून संपूर्ण समाजाची दिशाभूल करून आपले मनसुभे साधून घेणे हे कोण करत आहे… हे आपल्याला माहित नाही का…? तरीही हे विषारी रोप आपण का जोपासतोय..? एखाद्या व्यक्तीने केलेली चूक…. एखाद्या व्यक्तीने केलेले चुकीचे वर्तन… यासाठी ती व्यक्ती जबाबदार असते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या जातीला, धर्माला, वंशाला, पंथाला, संप्रदायाला दोष देता येत नाही. व्यक्तीच्या दोषाला त्या समाज घटकाचा दोष मानणे म्हणजे आपण सामाजिक ऐक्य नाकारणे असा होतो.
म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला आपले सामाजिक जीवन सुखी, आनंदी आणि समृद्ध करायचे असेल. तर समाजातील सर्व घटकांचा स्वीकार करून एकमेकांशी सौहार्दतेचे, सहकार्याचे सहसंबंध आपण जोपासले पाहिजेत. आणि भविष्यातल्या पिढीला सुद्धा ही शिकवण दिली पाहिजे. आपल्या विचारांमध्ये वागण्यामध्ये जात-पात पंथ यापेक्षा माणूस आणि माणुसकी मोठी असते. हे दिसले पाहिजे तरच उद्याच्या पिढीला समृद्ध सामाजिक जीवन जगता येईल. अन्यथा जी कटूता, द्वेष, तिरस्कार समाजातील वेगवेगळ्या घटकांचा.. वेगवेगळ्या घटकांबद्दल निर्माण केला जात आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. जी मंडळी हा द्वेष, तिरस्कार, कटुता निर्माण करत आहेत. त्या मंडळींना सुद्धा हा द्वेषाचा वणवा एक दिवस भस्मसात करणार आहे. काही क्षणापुरता आपला स्वार्थ साधला जात असेल; परंतु पुढील काळासाठी हा तिरस्काराचा भस्मासुर फोफावला जाणार आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. काहीकाळापुरता झालेला फायदा हा चिरकालासाठी नुकसानकारक ठरणार आहे. याचा विचार सजग जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.
आज पासून प्रत्येकाने ठरवा…. स्वतः पासून सर्वसमावेशक वागण्याची जाणीवपूर्वक सुरुवात करा ….जीवन जगत असताना प्रत्येक समाज घटकाशी सहकार्य वृत्तीने, नम्रतेने, प्रत्येकाचा योग्य आदर करून जीवन जगा. जीवन जगत असताना आपले दैनंदिन कामकाज सांभाळत असताना जे जे व्यक्ती आपल्यासोबत चांगले वागतील… सहकार्य करतील…. त्या प्रत्येक व्यक्तीशी मी चांगले वागणार आहे. त्यांना सहकार्य करणार आहे… हे करत असताना मी कधीही अशा व्यक्तींची जात, धर्म, वंश, पंथ, संप्रदाय बघणार नाही… तर याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणूसपणाचे सहसंबंध एकमेकांशी जपणार आहे. चांगल्या व्यक्तीसोबत चांगले वर्तन करणे हाच खरा मानवता धर्म आहे. दुराचराने वागणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याची संधी देऊ…. संधी देऊनही न सुधारणाऱ्या आणि समाजाचे तुकडे करणाऱ्या व्यक्तीला योग्य तेथे सर्वजण मिळून धडाही शिकवू …. पण विनाकारण कोणत्याही भडकाऊ विचारांना, आचारांना थारा न देता माणूस म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत…. हे वेळोवेळी सिद्ध करू…. समाजाच्या सर्व घटकात आपल्या समाज घटकाचा स्वार्थापुरता पुळका दाखवून …. सामाजिक कार्याच्या भरजरी शाली आणि झुली पांघरून …. आपल्या समाज घटकाच्या बळाचा वापर करून…. स्वार्थापुरते नेतृत्व करून… स्वतःचा मतलब साधून घेणाऱ्या समाजातील प्रवृत्ती सद्सदविवेक बुद्धीने समजून घ्या. अश्यापासून सावध राहा…. आपला वापर करून घेऊ देऊ नका …. प्रक्षोभक विचारांना बळी पडू नका …. काहीही कारण नसताना खोटा द्वेष, तिरस्कार, कटुता बाळगू नका… हट्टाने वैरभावना निर्माण करू नका…. हाताची बोटे जशी लहान-मोठी असतात तरीही एकत्र आलेल्या बोटांची वज्रमुठ तयार होते. कुटुंबात जसा लहान-मोठा भाऊ असतो तरीही एकत्र कुटुंबात सर्वांची सुरक्षितता आणि विकास साधला जातो. तसे समाजात संख्येने लहान-मोठे असणारे घटक असतात. कोणीही सर्वगुण संपन्न नसतो…. कमी-अधिकपणा, चांगले-वाईटपणा सर्वांमध्ये असतो…. तरीही एकमेकांना स्वीकारावे लागेल…. चुकत असेल तर समजावून सुधारावे लागेल ….. सर्वांनी एकमेकांचा आदर करून …. परस्परांबद्दल प्रेम ठेवून… आपुलकी-जिव्हाळा ठेवून एकत्र राहण्यात सर्वांचे हित आहे. चला तर मग … वेगवेगळ्या समाज घटकापासून बनलेला हा समृद्ध समाज… असाच मजबूत ठेवूयात…. आणि आपले सामाजिक जीवन सुखी समृद्ध करूयात…
