आज जालन्यात शिवकालीन ऐतिहासिक वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन
सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, कार्याध्यक्ष ॲड. अर्जुन राऊत यांची माहिती
जालना /प्रतिनिधी/धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जालन्यात शिवकालीन ऐतिहासिक वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे आणि कार्याध्यक्ष ॲड. अर्जुन राऊत यांनी आज येथे दिली. हे शस्त्र प्रदर्शन छत्रपती संभाजी उद्यानासमोर (मोतीबाग) बुधवार आणि गुरूवारी (ता. 14 आणि 15 मे 2025) आयोजिण्यात आले असून नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात हॉटेल मधूबनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष श्री कांबळे म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होण्याच्या दृष्टीने उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
उत्सवानिमित्त बुधवार आणि गुरूवारी (ता. 14 आणि 15 मे) शिवकालीन ऐतिहासिक वस्तुंबरोबरच त्या काळातील प्राचीण शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बदलापूर (जि. ठाणे) येथील सुप्रसिध्द अभ्यासक सुनिल कदम यांनी या दोनही दिवसात जालन्यात त्यांच्याकडे असलेली शिवकालीन शस्त्रे तसेच त्या कालावधीतील प्राचीन नाणि, ऐतिहासिक पत्रव्यवहार अशा विविध वस्तुंचे प्रदर्शन भरविण्याची तयारी दाखविली आहे.
यापुवही श्री कदम यांनी विविध शैक्षणिक संस्थांसह ठिकठिकाणी शिवकालीन शस्त्रास्यांच्या प्रतिकृती, त्या काळातील चलनी नाणी, मोडी लिपीतील पत्रे अशा ऐतिहासिक ऐवजांची प्रदर्शने भरविली आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि मोडी लिपीचे तज्ञ असलेल्या श्री कदम यांनी दुर्गवीर गडकिल्यांचे छायाचित्र प्रदर्शन यशस्वीरित्या भरविल्याचे सांगून कार्याध्यक्ष ॲड. राऊत म्हणाले की या निमित्ताने जालनेकर नागरिकांना शिवकालीन इतिहासाचे दर्शन होऊ शकणार आहे.
शिवकालीन शस्त्रांमध्ये खडग किंवा खांडा ही प्राचीन भव्य तलवार, धोप नावाची वैशिष्ट्यपूर्ण मराठा तलवार, पट्टा नामक दुधारी तलवार, अग्नीजन्य पदार्थ वापरून तयार केलेले दगडी तोफगोळे, विविध प्रकारचे भाले, ढाली, चिलखत, कथ्यारी, बाण, वाघनखे अशी ऐतिहासिक शस्त्रास्त्रे या दोन दिवसीय प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत.
पत्रकार परिषदेस निमंत्रक करण जाधव, सहकार्याध्यक्ष कपील खरात, निमंत्रक मंगेश मोरे, उपाध्यक्ष शुभम राजगुरे, सागर फेरपत्रेवार, किरण शिरसाठ, प्रशांत खरात, सहसचिव ऋतुराज कदम, आकाश जगताप, अनिल रत्नपारखे, बालासाहेब देशमुख, ॲड. सुनिल काळे, योगेश सोळुंके अन्य उपस्थित होते.
