जळगावसह छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठाशी
मुक्त विद्यापीठाचा त्रिपक्षीय सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन वेगवेगळ्या शिक्षणक्रमास प्रवेश घेता येणार
नाशिक/प्रतिनिधी/ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकाचवेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्यासमवेत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. जळगाव येथे दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या एका विशेष बैठकीत तीनही विद्यापीठांच्या वतीने यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० (एनईपी – २०२०) अंमलबजावणी मध्ये एक महत्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजय सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. विलास सपकाळ, य. च. म. मुक्त विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिह बिसेन, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. य. च. म. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील व एम. जी. एम. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाने तयार केलेले यासंदर्भातील माहितीपत्रकाचे प्रकाशन मा. कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांच्या हस्ते तर विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त अशा ‘पोर्टल फॉर टू डिग्री प्रोग्राम सायमंटेनिअसली’ या संकेतस्थळाचे उद्घाटन मा. कुलगुरू प्रा. संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. हे पोर्टल क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.nmu.ac.in यावर उपलब्ध आहे. या करारामुळे तिघा विद्यापीठांच्या लाखो विद्यार्थ्यांना नियमित पदवीचे शिक्षण घेतांना शेती व आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन तंत्रज्ञान, औषधीशास्त्र, या सारखे अनेक नवनवीन अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना यासोबतच नाविन्यपूर्ण शैक्षणिक व अध्ययन संधी, नोकरी – करीअरच्या विस्तृत संधी आणि व्यापक पर्यायाची उपलब्धतता, व्यक्तिमत्व विकास असे विविधांगी फायदे होणार आहेत.
याप्रसंगी बोलतांना मा. कुलगुरु प्रा. संजय सोनवणे यांनी सांगितले की सन २०४७ मधील विकसित भारत या अनुषंगाने नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. त्यादृष्टीने आजचा करार हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विद्यापीठांनी एकमेकांसोबत सहकार्य व संयुक्तपणे काम करून विकसित राष्ट्र घडविणे आवश्यक आहे, असे सांगून आपल्या विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. मा. कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांनी बोलताना आगामी काळ हा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठांनी तसे अभ्यासक्रम तयार करून देण्याचा असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने या करारामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होणार आहे, असे सांगत आपल्या विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती दिली. मा. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी काळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्धतेसाठी किमान एक कौशल्य अभ्यासक्रम शिकणे व विद्यापीठांनी आंतर विद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या अनुषंगाने दोन नियमित अभ्यासक्रम तासिकांचे वेळापत्रक सकाळ / सायंकाळ अशा सत्रात ठेवून किंवा एक नियमित अभ्यासक्रम आणि एक दूरस्थ अभ्यासक्रम अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. त्यात क.ब.चौ.उ.म विद्यापीठ हे अग्रस्थानी असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.
याप्रसंगी य. च. म. मुक्त विद्यापीठाचे परीक्षानियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्र (सी.आय.क्यू.ए. – सिका) संचालक प्रा. मधुकर शेवाळे, प्रा. हेमंत राजगुरू, एमजीएम विद्यापीठातर्फे आय क्यू. ए. सी. संचालक प्रा. परमिंदर कौर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. आशुतोष पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क.ब.चौ.उ.म विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचलन कुलसचिव डॉ. विनोद पाटील तर आभार आय. क्यू. ए. सी. संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी मानले.
