जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर- पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी, उद्योगांसाठी पाणी असे नियोजन करणे, जलसंधारण उपाययोजना राबविणे याला जलव्यवस्थापन म्हणतात. या व्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग असणे तसेच पाणी वापराचे भान व बचतीचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडले. हा पंधरवडा दि.१५ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब बिनवार, कार्य.संचालक संतोष तिरमणवार, ‘वाल्मि’ विभाग प्रमुख अविनाश गरुडकर, कार्यकारी अभियंता जाधव, मुख्य लेखापरीक्षक आर.डी. मुंदडा, निवृत्त कार्यकारी संचालक नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जलपूजन करण्यात आले.उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जल व्यवस्थापन कृती कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. त्यात लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांमध्ये जाऊन पाणी वापराचे नियोजन आणि बचत यासाठी जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जल व्यवस्थापन कृती आराखड्यात सहभागी व्हावे. पाणी व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने गाव तिथे वड, जल पुनर्भरण, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात कृषी जलसंपदा, जलसंधारण या सर्व विभागांनी एकत्रित येऊन उपाययोजना कराव्या. नागरिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग ही त्यात आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य अभियंता मुंदडा,संतोष तिरमनवार,अविनाश गरुडकर यांनी जलव्यवस्थापनाविषयी माहिती दिली. कार्यकारी अभियंता सबबिनवार यांनी प्रास्ताविकात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत आयोजीत कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन अश्विनी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत जाधव यांनी केले.
असा आहे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा
दि.१५- पंधरवडा प्रारंभ, दि.१६- जलसंपदा अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वयन, दि.१७- स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण, दि.१८- शेतकरी – पाणीवापर संस्था यांच्याशी संवाद, दि.१९- भूसंपादन, पुनर्वसन इ. अडचणींचे निराकरण व संयुक्त कालवा पाहणी, दि.२०- कालवा स्वच्छता अभियान, दि.२१ एप्रिल- उपसा सिंचन पाणी वापर तक्रारी निरसन, दि.२२- अनधिकृत पाणी वापर (वाणीज्य व औद्योगिक) प्रकरणे शोध मोहिम, दि.२३- पीक पद्धत, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत कृषी विभाग, जलसंपदा विभाग संयुक्त मार्गदर्शन, दि.२२४- सिंचन-ई प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी प्रकरणांचा आढावा, दि.२५- विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, दि.२६- पाण्याचा पुनर्वापर न करता धरणात, नदीत सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या प्रकरणांचा शोध घेणे, दि.२७- आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, दि.२८- महसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या संपादित जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन कारवाई, दि.२९ पाणवापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा, दि.३० पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा.
